कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे जगभरातील बहुतांश देशांनी लॉकडाउन (Lockdown करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एखाद-दुसरा देशच नव्हे तर अवघे जगच ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय, खासगी-सरकारी कार्यालयं ठप्प झाली. या सर्वात लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना बसला आहे. युनिसेफ (UNICEF) द्वारा तयार करण्यात आलेल्या एका अहवालातील आकडेवारी धक्कादायक आहे. लॉकडाऊन आणि कोरोना काळात भारतातील 27.5 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे.
यूनिसेफच्या अहवालाचा दाखला देत एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दक्षिण आशिया क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या तब्बल 60 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोरोना आणि लॉकडाऊन काळात मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या 24.7 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. शिवाय अंगणवाडी केंद्र आणि बालवाडी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवरही मोठा परिणाम झाला आहे. अंगणवाडी आणि बालवाडीमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2.8 कोटी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; परदेश शिष्यवृत्तीसाठी लागू केली सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा; गोरगरिबांच्या मुलांना मिळणार लाभ)
COVID-19 lockdown in India has impacted education of over 247 million school children: UNICEF report
Read @ANI Story | https://t.co/cD66fjgf8E pic.twitter.com/ZwJDvsT1Qp
— ANI Digital (@ani_digital) June 23, 2020
दरम्यान, भारतामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वेब पोर्टल्स, मोबाईल अॅप्स, टिव्ही चॅनेल्स, रेडिओ आणि पॉडकास्ट यासारख्या अनेक ई-प्लॅटफॉर्मवरुन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले जाईल यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) एक पाऊल पुढे टाकत पहिली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर तयार केले आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी बाहेर न पडता घरातुनच शिक्षण घेण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. मात्र, युनिसेफचा अहवाल सांगतो की, भारतातील केवळ 24% म्हणजेच एक चतुर्थांश कुटुंबांकडे इंटरनेट वापरले जात आहे.