केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणासोबतच कौशल्य विकास शिक्षणही दिले जाणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ वेळोवेळी स्वतःला अपडेट करत आहे. आजकाल कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात वाढ व विकास पाहायला मिळत असल्याने, नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) लागू करताना, सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात अशा कौशल्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळने अलीकडेच नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आता सहावीपासून व्यावसायिक शिक्षण तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. आतापर्यंत नववीपासून कौशल्य शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम शिकवले जात होते. परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्ता, कोडिंग, माहिती तंत्रज्ञान, मानवता आणि कोविड, खादी काश्मिरी भरतकाम, रॉकेट, सॅटेलाइट इत्यादी विषय सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत समाविष्ट केले जातील.
सीबीएसई बोर्डाने 33 अभ्यासक्रमांची यादी प्रसिद्ध केली आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, हे कौशल्य मॉड्यूल 12 ते 15 तासांचे असतील. यामध्ये 30 टक्के वेळ थेअरीसाठी आणि 70 टक्के वेळ उपक्रमांसाठी असेल. इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमात डेटा सायन्सचा समावेश करण्यात आला आहे. जगातील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट कोडिंगचा अभ्यासक्रम तयार करणार आहे. बोर्डाने यासंदर्भातील माहिती सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांना पाठवली आहे.
लहान वयातच कोडिंग आणि एआय सादर करण्याचा बोर्डाचा निर्णय विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्यास, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भविष्यातील करिअरसाठी तयार करण्यात मदत करेल. (हेही वाचा: NCERT ने विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकला डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत)
दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची रूपरेषा निश्चित केली होती. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये, कौशल्य आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सुरू करण्यात आली आहे. या धोरणाद्वारे भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावेल.