NCERT Removes Darwin Evolution Theory: NCERT ने विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकला डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत
Charles Darwin's (PC- Wikimedia Commons)

NCERT Removes Darwin Evolution Theory: मुघल काळातील अनेक संदर्भ काढून टाकल्यानंतर आता NCERT ने जगातील महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (Charles Darwin's) यांचा उत्क्रांती सिद्धांत (Theory of Evolution) देखील विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता डार्विनचा हा सिद्धांत 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात नसेल. बोर्डाच्या निर्णयावर आता प्रश्न निर्माण झाले आहेत.

या प्रकरणी देशभरातील 1,800 हून अधिक शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विज्ञानाशी संबंधित लोकांनी NCERTच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून एक खुले पत्रही जारी केलं आहे. एनसीईआरटीच्या या निर्णयाबाबत ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीने एक प्रेस स्टेटमेंट जारी केले आहे. त्यात 'अभ्यासक्रमापासून उत्क्रांतीच्या सिद्धांताविरुद्ध अपील' या शीर्षकाच्या पत्राचाही समावेश आहे. त्यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या मोठ्या वैज्ञानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली आहे. हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन लोकांनी मंडळाला केले आहे. (हेही वाचा - Heatwave In Maharashtra: महाराष्ट्रात वाढल्या उन्हाच्या झळा; पालकांची CBSE सह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सध्या सकाळच्या सत्रात घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांना विनंती)

एनसीईआरटीने कोविड-19 महामारीनंतर विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी अभ्यासक्रमाला आणखी तर्कशुद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे याआधी मुघलांशी संबंधित अनेक संदर्भ काढून टाकण्यात आले. आता विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील 9वा अध्याय, 'आनुवंशिकता आणि उत्क्रांती' ची जागा 'आनुवंशिकता' ने घेतली आहे. या प्रकरणात, शिक्षणतज्ज्ञांचा असा विश्वास होता की हे केवळ एका शैक्षणिक सत्रासाठी केले गेले आहे, परंतु आता ते कायमचे अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहे. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अभ्यासक्रमातून काढून टाकणे म्हणजे 'शिक्षणाची थट्टा' आहे, असे वैज्ञानिक समुदायाचे मत आहे.

डार्विनच्या सिद्धांताबाबत, शास्त्रज्ञांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, उत्क्रांतीचा सिद्धांत मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत विद्यार्थ्यांना गंभीर विचार आणि वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व शिकवतो. म्हणूनच विद्यार्थ्यांना डार्विनच्या सिद्धांताचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे.

काय आहे डार्विनचा सिद्धांत?

महान शास्त्रज्ञ चार्ल्स रॉबर्ट डार्विनने सांगितलेला 'इव्होल्यूशन बाय नॅचरल सिलेक्शन' हा वैज्ञानिक सिद्धांत आधुनिक उत्क्रांती अभ्यासाचा पाया मानला जातो. डार्विनने असा निष्कर्ष काढला की, पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व प्रजाती मुळात एकाच प्रजातीचे मूळ आहेत. परिस्थितीनुसार स्वतःला साचेबद्ध करण्याची प्रवृत्ती जैवविविधतेला जन्म देते. NCERT ने आता डार्विनच्या या सिद्धांताशी संबंधित सर्व गोष्टी अभ्यासक्रमातूनच काढून टाकल्या आहेत.