
भारतावर मागील काही दिवसांत अवकाळीचे ढग बरसून गेल्यानंतर आता उष्णतेने देश होरपळत आहे. महाराष्ट्रालाही उन्हाच्या झळा बसल्या आहेत. राज्यातील वाढत्या तापमानामुळे केंद्रीय बोर्डाने सध्या सुरू असलेल्या शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केली आहे. सकाळी 11 च्या आधी शाळा भराव्यात यासाठी काहींनी मागणी केल्याचं समोर आलं आहे. खारघर उष्माघाताच्या दुर्घटनेनंतर अनेक जण या वाढत्या उष्णतेवरून सतर्क झाले आहेत.
नवी मुंबई पालक संघटना आणि महाराष्ट्रातील इतरही काही संघटनांनी राज्यात सीबीएसई सह केंद्रीय बोर्डाच्या इतरही काही शाळा केवळ सकाळच्या सत्रामध्ये सुरू ठेवाव्यात अशी मागणी केली आहे. पालकांच्या मागणीवर विचार करून काही शाळांनी त्यांच्या स्तरावर शाळेच्या वेळेत बदल करून ते सकाळच्या सत्रात भरवण्याची सोय केली आहे. त्यामुळे वर्ग 11 पूर्वीच सुरू होतात.
महाराष्ट्रामध्ये स्टेट बोर्डच्या शाळांची उन्हाळी सुट्टी आहे त्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत पण सीबीएसई आणि केंद्रीय बोर्डाच्या अन्य शाळा उत्तर भारतातील हवामानानुसार त्यांचं वेळापत्रक बनवत असल्याने देशभर त्या 10 मे पर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर उन्हाळी सुट्टी असणार आहे. पण 10 मे पर्यंत या शाळा सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याची आता पालकांची मागणी आहे. Maharashtra Schools: विदर्भातील शाळा 30 जून, तर इतर जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून सुरु- Minister Deepak Kesarkar .
वातावरणीय बदल पाहता यंदा मार्च महिन्यात राज्याला अवकाळीने झोडपून काढलं त्यानंतर आता एप्रिल महिन्यातच राज्यात पारा 40 अंशावर पोहचला आहे. अनेक भागात भयाण उष्णता जाणवत आहे. राज्य सरकार कडून नुकताच हीट वेव्हचा अंंदाज पाहता उष्णता कमी होत नाही तो पर्यंत दुपारी 12 ते 5 या वेळेत खुल्या मैदानांवर कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.