स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji) मालिका एका महत्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोयराबाई आणि कारभारी यांनी शंभूराजेंविरुद्ध कटकारस्थान सुरु केले, त्याचा निवडा सध्या चालू आहे. सत्तेसाठी प्रत्यक्ष आईने आपल्यासोबत असे कट करावे हे पाहून संभाजीराजे कासावीस झाले आहेत. जणू काही संपूर्ण रायगडच त्यांचा दुश्मन बनला आहे. या सर्वात गडावरील एकच व्यक्ती संभाजी महाराजांसोबत होती ती म्हणजे पुतळाबाईसाहेब. सईबाई सोडून गेल्यानंतर आई म्हणून पुतळाबाईंनीच शंभूराजांना जवळ केले, मायेने त्यांना साथ दिली. अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या हतबल झाल्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही. म्हणूनच आज संभाजी महाराजांसाठी त्याच आई आणि त्याच वडील आहेत. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 85 दिवसांनी पुतळाबाई सती गेल्या (शिवाजी महाराजांचे निधन 19 फेब्रुवारीला मानले तर). आज एक आई आणि एक पत्नी कशी असावी याचा दाखला देण्यासाठी पुतळाबाई साहेबांचे नाव घेतले जाते.
पुतळाबाई भोसले या शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह 1653 मध्ये झाला. शिवरायांनी आपला तिसरा विवाह मोहिते घराण्यास राजी राखून स्वराज्य सेवेत आणण्यासाठी केला. स्वराज्य संवर्धनास मोहिते यांचा मातब्बर जमाव उपयोगी पडेल, असे शिवरायांना वाटले. संभाजी मोहिते पुढे गैर वागला, गैर बोलला म्हणून 24 सप्टेंबर 1656 रोजी शिवरायांनी त्याला पदच्युत केले. सुपे येथील मोहिते आणि पुणे येथील भोसले ही दोन्हीही त्या काळातील मातब्बर घराणी होती. पुणे येथील शहाजीराजांच्या जहागिरीत हे लग्न थाटामाटात पार पडले.
आयुष्यभर राजांना मोठा आधार फक्त जिजाऊचां त्यानंतर राणीसाहेब सईबाईंचा. तद्नंतर राजांना एकच आधार वाटत होता तो धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचा. पुतळाबाई निपुत्रिक असूनही त्यांनी संभाजीराजांना अगदी आपल्या पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवले, संस्कारी बनवले. शिवरायांच्या पुत्राकडून चूक होणार नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येकवेळी त्यांना समजून घेतले, त्यांच्या चढ उतार काळात त्यांना साथ दिली. ममतेचा महामेरू, वात्सल्याची मूर्ती म्हणून पुतळाबाई साहेबांकडे पहिले जाते. (हेही वाचा : अखेर संभाजी राजे आणि सोयराबाई यांची भेट घडली; मायेसाठी आसुसलेल्या शंभूराजेंनी केली ही विनवणी)
शिवरायांचे निधन झाल्यावर राजांचा अंत्यविधी घाई-घाईने उरकण्यात आला. राजांच्या निधनानंतर एकही पत्नी सती गेली नाही. कारण राजांनी सतीप्रथा बंद केली होती. पण पुढे पुतळाबाई सती गेल्या. भारतातील सती प्रथेला प्रखर विरोध करणारे शिवाजीराजे हे पहिले राजे आहेत. राजांनी शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वत:च्या मातोश्री जिजाऊमाँसाहेब यांना सती जाण्यास विरोध केला व या क्रूर परंपरेला तिलांजली दिली.
शिवापुर शकावली व मराठा साम्राज्याची छोटी बखर सांगते की, शिवरायांच्या निधनानंतर संभाजीराजेंच्या परवानगीने आषाढ शुद्ध एकादशी शके 1602 (27 जुन 1680) रोजी शिवरायांचे जोडे घेऊन पुतळाबाई सती गेल्या. शिवतिर्थ रायगडावर सती जाणाऱ्या पुतळाबाई या एकमेव राणी होत्या. त्यानंतरच्या काळात पुतळाराणीसाहेब यांचा कुठेही उल्लेख दिसत नाही व मृत्यूबाबतही पुरेशी खरी माहिती उपलब्ध होत नाही. छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या बाजूला जी वाघ्या कुत्र्याची समाधी सांगितली जाते ती वाघ्याची नसून पुतळाराणीसाहेब यांची असल्याचे काही इतिहासकार सांगतात.