Swarajyarakshak Sambhaji Episode 18 जानेवारी, 2019 : परवाच्या (17 जानेवारी) भागात कारभाऱ्यांचे घडलेले कबुलीजबाब आपण पाहिलेत. यात सर्वांनी अनाजीपंत यांच्याकडे बोट दाखवल्यानंतर आता आपली सुटका नाही, हे पंतांच्या लक्षात येते. त्यावेळी ते शेवटचे शस्त्र उगारतात, आणि सदरेवर नाव घेतले जाते ते राजमातोश्री सोयराबाई यांचे. आपसूकच अनाजी पंतांचा वार शंभूराजेंवर होतो आणि ते सदर सोडतात. स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji)च्या कालच्या (18 जानेवारी) भागाची सुरुवात शंभूराजेंच्या सदर सोडण्याने होते. संतापलेल्या शंभूराजेंची पावले सोयराबाईसाहेबांच्या महालाकडे पडू लागतात. डोक्यात विचारांचे थैमान माजलेले असते. 'कटात सोयराबाईदेखील सामील होत्या, त्यांनीच हे सर्व आदेश दिले होते; शंभूराजेंच्या अटकेचा आदेश तर राजाराम महाराजांच्या सही शिक्क्यांचा होता', अनाजीपंतांचे शब्द शंभूराजेंच्या डोक्यात घुमत असतात. इच्छा नसतानाही पाय गती घेत असतात. एकीकडे आपल्या मातोश्री तर दुसरीकडे सदरेवर अपराधी म्हणून घेतलेले नाव. गोंधळलेल्या शंभूराजेंसमोर डावलले गेलेले, अपमानाचे, तिरस्काराचे एक एक प्रसंग उभे राहतात. थोरल्या महाली जाऊन काय बोलणी होणार याबाबतही त्यांचे मन सांशक असते.
दरम्यान येसूबाईंना सदरेवर घडलेली हकीकत कळते, घाबऱ्या झालेल्या येसूबाई राजेंना शोधायला बाहेर पडतात. आता कोणता मोठा अनर्थ होईल या विचाराने कासावीस झालेल्या येसूबाई पुतळाबाईसाहेबांच्या महाली येतात. सदरेवर अपराधी म्हणून अनाजी पंतांनी सोयराबाईंचे नाव घेतल्याचे त्या पुतळाबाईंना सांगतात. पुतळाबाई येसूबाईंना शांत करतात. सोयराबाई आणि शंभूराजे यांची भेट कधी ना कधी व्हायचीच, ती आज होईल. सत्य काय असत्य काय समोर येईल. एकमेकांच्यामध्ये उभी राहिलेली गैरसमजाची दरी मिटेल, त्यामुळे आज ही भेट होऊ दे असे त्या सांगतात.
इतक्यात शंभूराजे थोरल्या महाली पोहचतात. सोयराबाईंना वर्दी जाते, मात्र त्या महालाचे दरवाजे बंद करण्यास सांगतात, आणि सोयराबाईंच्या डोळ्यासमोर उभा राहतो गडाचे दरवाजे बंद करण्याचा आदेश दिल्याचा प्रसंग. त्यावेळीदेखील असेच शंभूराजेंना गडावर येण्यापासून रोखले होते. मात्र आज शंभूराजे कोणत्याही गोष्टीचा मुलाहिजा न राखता सोयराबाई साहेबांच्या महाली प्रवेश करतात. इतक्या घटना घडल्यानंतर आज पहिल्यांदा सोयराबाई आणि शंभूराजे समोरा समोर आलेले असतात. मात्र सोयराबाई काही झालेच नाही अशा अविर्भावात हा 'आमचा' महाल असल्याचे सांगतात. शंभूराजेही त्यांना हा आपल्या आईचा महाल आहे, त्यामुळे आम्ही इथे येणार असे उत्तर देतात.
सोयराबाई त्यांना महाली येण्याचे प्रयोजन विचारतात, त्यावेळी कटकारस्थानाच्या निवाड्यावेळी आनाजीपंतांनी आपले नाव घेतले असल्याचे राजे सांगतात, त्याबद्दल जाब विचारतात. मात्र करारी सोयराबाई तितक्याच ठामपणे आम्ही जवाब देण्यास बांधील नसल्याचे सांगतात. चिडलेले शंभूराजे तुम्हाला बोलावे लागेल असे सांगतात, आणि प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. का आम्हाला गडावर येण्यापासून रोखले? का आबासाहेबांच्या आजारपणाची, महानिर्वाणाची खबर आम्हाला दिली नाही? का आमच्या अटकेचे आदेश निघाले? मात्र सोयराबाई फक्त लंगड्या सबबी मांडत राहतात. शंभूराजे मातोश्रींसमोर हात जोडतात, आमचे काय चुकले? आम्ही कुठे कमी पडलो? का आमचा एव्हढा तिरस्कार केला जातो? मात्र त्यालाही सोयराबाई काहीच प्रतिसाद देत नाहीत, हे पाहून शंभूराजे म्हणतात, ‘एक आई म्हणून सांगितले असते तर आम्ही स्वराज्याच्या त्याग कधीच केला असता.’ शंभूराजेंच्या मनात एकच दुःख सलत असते ते म्हणजे, आबासाहेबांना शेवटचे पाहू शकलो नाही, त्यांच्या महानिर्वाणाची खबर दिली गेली नाही.
मात्र यालादेखील सोयराबाई ‘तुम्ही दिलेरखानाच्या गोठातून आला आहात, त्यामुळे हे करावे लागले’ असे उत्तर देतात. शंभूराजे त्यांना समजावत राहतात की थोरल्या महाराजांचा तो एक गनिमीकावा होता. मात्र त्याला सोयराबाई पित्याच्या ममतेची झालर लावतात, महाराजांनी आपल्या मुलाच्या चुकांकडे कानाडोळा केला, त्यांची ती मजबुरी असू शकते असे त्या म्हणतात. तरी शंभूराजे त्यांना समजून घेण्याची विनवणी करत राहतात, आई म्हणून आम्ही आपणास किती मानतो याचे दाखले देत राहतात मात्र सोयराबाईंना काहीच समजून घ्यायचे नसते. हतबल झालेले शंभूराजे आबासाहेबांनी हे इतके मोठे स्वराज्य उभे केले, गुण्या गोविंदाने जनता नांदू लागली, मात्र सोयराबाई कटकारस्थानात सामील झाल्या. कारभाऱ्यांच्या शब्दाला भुलल्या, वाहवत गेल्या. त्यांच्याकडून कशा चुका होत गेल्या हे कथन करत राहतात, मात्र सोयराबाई आपल्या विचारांवर ठाम असतात.
शेवटी हे सर्व सहन न झालेल्या शंभूराजेंच्या संतापाचा उद्रेक होतो, सोयराबाईंनी केलेल्या कृत्याला ते राजद्रोह, स्वराज्यद्रोहाचे नाव देतात. यासाठी तुम्हाला शिक्षा का मिळू नये असा सवाल खडा करत ते महालातून बाहेर पडतात. ज्या वेगाने पावले महालात आली त्याच वेगात ती बाहेर पडली, आणि महालाबाहेर उभे असतात ते राजाराम महाराज.