Rishi Sunak (File Image)

सध्या इंग्लंडच्या (England) राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि आरोग्य सचिव साजिद जाविद (Sajid Javid) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुनक यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वतः ऋषी सुनक यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सरकार योग्य, गांभीर्याने आणि सक्षमपणे चालवले जाईल, अशी जनतेची अपेक्षा असते, परंतु अनेकदा तसे होत नाही. मंत्री म्हणून ही माझी शेवटची नोकरी असू शकते परंतु मला विश्वास आहे की या मानकांसाठी लढले पाहिजे. यामुळेच मी पंतप्रधान बोरिस यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे.’

साजिद जाविद म्हणाले की, घोटाळ्यांच्या मालिकेनंतर जॉन्सन यांच्या राष्ट्रीय हितासाठी शासन करण्याच्या क्षमतेवरील त्यांचा विश्वास उडाला आहे. ते पुढे म्हणाले की, जॉन्सन यापुढे चांगल्या विवेकाने वागू शकत नाही. सुनक आणि जाविद यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे आधीच संकटाने घेरलेल्या पीएम जॉन्सनच्या अडचणी वाढल्या आहेत. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. ते इन्फोसिसचे एन नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. तर साजिद जाविद हे पाकिस्तानी वंशाचे आहेत.

लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होऊनही वरिष्ठ पदावर नियुक्त झालेल्या खासदाराबाबत स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप जॉन्सन यांच्यावर केला जात होता. जूनच्या सुरुवातीला, जॉन्सन यांना विश्वासदर्शक मताचा सामना करावा लागला होता, ज्यामध्ये ते 359 पैकी 211 कंझर्व्हेटिव्ह खासदारांचा पाठिंबा मिळवून यशस्वीपणे टिकून राहिले. त्यावेळी समीक्षकांनी चेतावणी दिली होती की, हे मतदान त्यांच्या तीन वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या समाप्तीची सुरुवात आहे. (हेही वाचा: Elon Musk यांच्या मुलीने वडिलांविरोधात कोर्टात घेतली धाव, पाहा काय आहे कारण)

मात्र त्यावेळी आरोग्य सचिव साजिद जाविद यांच्यासह जॉन्सन यांच्या अनेक समर्थकांनी, या मतदानामुळे पंतप्रधानांना ‘नवीन जनादेश’ मिळाल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले होते. याआधी देश कोविड-19 लॉकडाऊनमध्ये असताना डाउनिंग स्ट्रीटमध्ये अनेक पार्ट्या आयोजित केल्याच्या आरोपांमुळेही त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. जॉन्सन यांना एका वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल पोलिसांनी 50 पौंड दंड ठोठावला होता, ज्यामुळे पदावर असताना कायदा मोडणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.