जगभरात अजूनही कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक देशांमध्ये या विषाणूने त्याची नव नवीन रूपे तयार केली आहे, ज्यामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. आता दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) संशोधकांनी म्हटले आहे की देशात कोरोना व्हायरस निर्माण करणारा विषाणू Sars-CoV-2 चा एक नवीन प्रकार सापडला आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, हा नवीन प्रकार वेगाने पसरू शकतो. महत्वाचे म्हणजे कोरोना व्हायरस लस देखील त्यावर कमी प्रभावी ठरू शकेल, असेही त्यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसच्या या प्रकाराला C.1.2 असे नाव देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनल डिसीजेसने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, हा प्रकार आतापर्यंत आढळलेल्या सर्व प्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो. हा प्रकार पहिल्यांदा आफ्रिकेत मे महिन्यात सापडला. तेव्हापासून, या प्रकाराचे रुग्ण चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्ये सापडले आहेत. अभ्यासक म्हणाले आहेत की, C.1.2 प्रकारचे इतर 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' आणि 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' प्रकारांपेक्षा अधिक म्युटेशन झाले आहे.
या एनसीआयडी अभ्यासाचे अद्याप पूर्ण रिव्ह्यू करणे बाकी आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेतील साथीच्या पहिल्या लाटेत सापडलेला C.1 प्रकार बदलून पुढे C.1.2 झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत या नवीन प्रकाराची जीनोम संख्या दरमहा वाढत आहे. जीनोमचा सिक्वेंस मे मध्ये 0.2 टक्के होता, जो जूनमध्ये 1.2 टक्के झाला आणि नंतर तो जुलैमध्ये 2 टक्के झाला.
संशोधकांनी लिहिले आहे की, म्युटेशन N440K आणि Y449H हे C.1.2 च्या सिक्वेंसमध्ये आढळले आहेत, जे विशिष्ट अँटीबॉडीजपासून त्यांची प्रतिकारशक्ती संपवते. हे म्युटेशन बदलासह अँटीबॉडीज पासून संरक्षण करण्यास मदत करते. (हेही वाचा: Covid-19 Third Wave: कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची- ICMR)
अभ्यासातून असे दिसून आले की C.1.2 मध्ये दरवर्षी 41.8 म्युटेशन होतात. हे सध्याच्या जागतिक दरापेक्षा अंदाजे 1.7 पट वेगवान आहे आणि SARS-CoV-2 उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा 1.8 पट अधिक वेगवान आहे.