Covid-19 Third Wave: कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची- ICMR
Coronavirus in India (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असल्याने काहीसे निश्चिंत झालेल्या नागरिकांना आता पुन्हा सतर्क व्हावे लागणार आहे. कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान कधीही येऊ शकते, असा अंदाज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (Indian Council of Medical Research) वर्तवला आहे. परंतु, तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल, असेही ICMR कडून सांगण्यात आले आहे. (COVID-19 Third Wave: 'या' राज्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; नियमांचे पालन न करणे पडेल महागात)

आयसीएमआरच्या Epidemiology and Communicable Diseases विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, "देशात तिसरी लाट कधी येईल, याचा अंदाज कोणालाच वर्तवता येणार नाही. परंतु, जिल्हा किंवा राज्य निहाय डेटावरुन एक अंदाज बांधणे शक्य होईल. राज्यांनी जर विचार न करता निर्बंध काढले तरच लाट उसळी घेईल. तसंच जलद गतीने पसरणारा वेरिएंट किंवा कोरोना नियमांचे पालन न केल्यास रुग्णसंख्या झपाट्याने वाढू शकते."

पुढे ते म्हणाले की, "लसीकरणामुळे पुढील लाटेसाठी कारणीभूत ठरणारे घटक आता कमी होत आहेत. मात्र डेल्टा सारख्या नव्या वेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यातच कोरोना नियमांचे उल्लंघन, लसीचा तुटवडा यांसारख्या गोष्टींची भर पडते."

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा फैलाव कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये यंदा रुग्ण अधिक वाढू शकतात. तर ज्या जिल्ह्यांमध्ये मागील लाटेत अधिक रुग्ण होते तिथे रुग्णसंख्येत घट पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आज भारतात 42,909 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 380 मृतांची नोंद झाली आहे. तर 34,763 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 3,76,324 सक्रीय रुग्ण असून 63.43 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.