प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

युक्रेन आणि रशिया युद्धाच्या (Russia Ukraine War) काळात युक्रेनमधून लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. एका अहवालानुसार, 10 दिवसांत 1.5 दशलक्ष युक्रेनियन लोकांनी शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनवरचे हे मोठे संकट मानले जात आहे. युनायटेड नेशन्सचे (UN) उच्चायुक्त फिलिपो ग्रँडी यांनी या संकटाचे वर्णन दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात वेगाने वाढणारे संकट असे म्हटले आहे. युद्धग्रस्त भाग सोडल्यानंतर युक्रेनचे नागरिक पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया यांसारख्या देशांमध्ये आश्रय घेत आहेत. आतापर्यंत सर्वाधिक निर्वासित पोलंडमध्ये पोहोचले आहेत, जो देश मदत करण्यात आघाडीवर आहेत.

ग्रँडी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘10 दिवसांत युक्रेनमधून 1.5 दशलक्षाहून अधिक शरणार्थी शेजारच्या देशांमध्ये पोहोचले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील हे सर्वात वेगाने वाढणारे निर्वासित संकट आहे. पोलंडच्या सीमा रक्षकांकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, शनिवारी 1,29,000 लोकांनी सीमा ओलांडली. युद्ध सुरू झाल्यापासून एकाच दिवसात एकूण 9,22,400 लोकांना सीमेपलीकडे आणण्यात आले आहे. पोलिश बॉर्डर गार्डच्या प्रवक्त्याने सांगितले की, 24 फेब्रुवारीपासून युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश करणार्‍या लोकांची संख्या एक दशलक्षाहून अधिक होईल.

पोलंडच्या युक्रेनला लागून असलेल्या जवळपास 500 किमी सीमेवर असलेल्या सर्वात व्यस्त मेड्यका क्रॉसिंगवर मोठ्या संख्येने निर्वासितांनी आश्रय घेतला आहे. त्यांना स्काउट्सकडून गरम चहा, जेवण आणि प्रसाधन सामग्री दिली जात आहे. युक्रेनला लागून असलेल्या पोलंड, रोमानिया, मोल्दोव्हा या शेजारील देशांच्या सीमा चौक्यांवर 10 मैल लांब लोकांच्या रांगा आहेत. (हेही वाचा: युक्रेनने मागितली भारताकडे मदत; युद्ध थांबवण्यासाठी PM Narendra Modi यांनी पुतीन यांच्याशी चर्चा करावी)

दरम्यान, रशियाचे सैन्य युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहेत. कीवमध्ये रशियन सैन्याने मोठा विध्वंस केला आहे. रशियाचा हल्ला थांबवण्यासाठी युक्रेनने पाश्चात्य देशांवर शस्त्रास्त्रांसाठी दबाव आणला आहे. युक्रेनियन पोलिसांनी सांगितले की, ईशान्येकडील खार्किव प्रदेशात सतत रशियन गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमुळे अनेक लोक मारले गेले. त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की युक्रेनच्या आरोग्य सुविधांवर अनेक हल्ले झाले आहेत, ज्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे.