युक्रेनने (Ukraine) पुन्हा एकदा भारताला रशियासोबत (Russia) सुरू असलेले युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा (Dmytro Kuleba) यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्यासाठी त्यांचा प्रभाव वापरण्यास सांगितले. कुलेबा यांनी पीएम मोदींना आवाहन केले आणि सांगितले की त्यांनी पुतीन यांना समजावून सांगावे की, युद्ध थांबवणे हे सर्वांच्या हिताचे आहे. अशाप्रकारे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची मनधरणी करून त्यांच्याशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
दिमित्रो कुलेबा म्हणाले की, भारतातील रशियन दूतावासावर दबाव आणून भारत रशियाकडे युद्ध थांबवण्याची मागणी करू शकते. युक्रेन लढत आहे कारण आमच्यावर हल्ला झाला आहे आणि आम्हाला आमच्या भूमीचे रक्षण करायचे आहे. पुतिन आमच्या अस्तित्वाचा अधिकार ओळखत नाहीत. भारताशी विशेष संबंध असलेले सर्व देश पंतप्रधान मोदींना राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करू शकतात आणि हे युद्ध कोणाच्याही हिताचे नाही हे पटवून देऊ शकतात. रशियाच्या लोकांनाही या युद्धात रस नाही.
कुलेबा पुढे म्हणाले की, संपूर्ण जगात या युद्धात रस असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे स्वत: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत. जागतिक आणि भारतीय अन्नसुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे युद्धही थांबवावे लागेल. याआधी युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी पंतप्रधान मोदींकडे या युद्धात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्याच्या 24 तारखेला रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर, म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी, पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. (हेही वाचा: Russia Ukraine Crisis: युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिक सुखरूप बाहेर पडेपर्यंत रशियाची अंशतः युध्दविरामाची घोषणा)
दरम्यान, कुलेबा यांनी सांगितले की, 30 वर्षांपासून युक्रेन हे आफ्रिका, आशियातील हजारो विद्यार्थ्यांसाठी घर आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी युक्रेनने ट्रेनची व्यवस्था केली, हॉटलाइनची स्थापना केली, दूतावासांसह काम केले, युक्रेनियन सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दावा केला की रशिया युक्रेनमधील परदेशी नागरिक असलेल्या देशांची ‘सहानुभूती मिळवण्याचा’ प्रयत्न करत आहे.