पाकिस्तान मध्ये तोडण्यात आलेल्या हिंदू मंदिराचे पुननिर्माण, आतापर्यंत  50 जणांना करण्यात आली अटक
पाकिस्तान झेंडा | Representative image

मुलतान: भारताच्या दबावापुढे अखेर पाकिस्तानला झुकावे लागले आहे . पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील उद्ध्वस्त मंदिराची दुरुस्ती करण्यात आली असून नंतर ते हिंदू समुदायाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. जिल्हा प्रशासक खुर्रम शहजाद म्हणाले की, स्थानिक हिंदू लवकरच मंदिरात पूजा पुन्हा सुरू करतील.लाहोर पासून 590 किमी अंतरावर प्रांताच्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील गणेश मंदिरावर 4 ऑगस्ट रोजी जमावाने हल्ला केला होता. एका स्थानिक मदरशात लघवी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आठ वर्षांच्या हिंदू मुलाची न्यायालयाने सुटका केल्याच्या निषेधार्थ जमावाने मंदिरावर हल्ला केला होता. (Pakistan: 8 वर्षांच्या हिंदू मुलावर चालू आहे 'ईशनिंदे'चा खटला; जगभरातून होत आहे निषेध, जाणून घ्या नक्की काय आहे आरोप )

पंजाब प्रांतातील दुर्गम शहरात हिंदू मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी 50 हून अधिक लोकांना अटक केली आहे आणि 150 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंदिराचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल अधिकाऱ्यांना फटकारले होते. पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी शुक्रवारी सांगितले की, मंदिराची तोडफोड देशासाठी लज्जास्पद आहे. आठ वर्षांच्या मुलाच्या अटकेबद्दल आश्चर्य व्यक्त करत सरन्यायाधीशांनी पोलिसांना विचारले की, ते अशा लहान मुलाची मानसिक स्थिती समजू शकत नाहीत का? पाकिस्तानच्या संसदेने शुक्रवारी मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. या प्रकरणाची सुनावणी 13 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भारताने गुरुवारी नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोग प्रभारींना बोलावून पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायाचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबाबत तीव्र निषेध नोंदवला.

हिंदू हा पाकिस्तानातील सर्वात अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत अंदाजानुसार पाकिस्तानमध्ये 75 लाख हिंदू राहतात.  समुदायाच्या मते, देशात 90 लाखांहून अधिक हिंदू राहतात. पाकिस्तानचे बहुतेक हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे, जिथे ते संस्कृती, परंपरा आणि भाषा मुस्लिम रहिवाशांसह सामायिक करतात.