पाकिस्तानमधून (Pakistan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे अवघ्या आठ वर्षांच्या मुलाला फाशीची शिक्षा होऊ शकते. हा मुलगा देशातील असा सर्वात लहान मुलगा बनला आहे, ज्याच्यावर ईश्वरनिंदाच्या (Blasphemy) आरोपांबाबत न्यायालयात खटला चालविला जात आहे. हा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय सध्या पोलीस कोठडीत आहेत. या मुलाला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, ज्याच्या निषेधार्थ मुस्लिम जमावाने पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील हिंदू मंदिरावर हल्ला केला. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
मिडीया रिपोर्टनुसार, या आठ वर्षांच्या मुलावर आरोप आहे की त्याने मदरसाच्या ग्रंथालयात लघवी केली. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली. जमावाने मुलावर ईश्वराची निंदा केल्याचा आरोप केला. यासंदर्भात पाकिस्तानमध्ये एक कायदा आहे, ज्याअंतर्गत फाशीची तरतूद आहे. यापूर्वीही देशात ईशनिंदाची अनेक प्रकरणे घडली आहेत, ज्यात जमावाने हिंसाचार पसरवला आहे आणि प्राणघातक हल्ले केले आहेत. आता या घटनेनंतर अशांत प्रवण रहीम यार खान जिल्ह्यातील भोंगमध्ये निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. (हेही वाचा: Pakistan झाला इतका कंगाल, की निधी उभारण्यासाठी PM Imran Khan यांचे अधिकृत निवासस्थान देणार भाड्याने)
येथील मंदिरावर हल्ला झाल्यापासून, हिंदू लोक खूप घाबरले आहेत आणि त्यांना घरे सोडण्यास भाग पाडले आहे. मुलाच्या कुटुंबातील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनला सांगितले की, 'मुलाला ईशनिंदाबद्दल काही माहितीही नाही. या प्रकरणात त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्याला समजतही नाही की त्याचा नक्की गुन्हा काय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला एका आठवड्यासाठी तुरुंगात ठेवले गेले. आता आम्ही आमचे दुकान आणि काम सोडले आहे, संपूर्ण समाज घाबरला आहे. आम्हाला त्या भागात परत जायचे नाही.'
ही बाब समोर आल्यापासून जगभरातील कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की. मुलावर लावण्यात आलेले ईशनिंदाचे आरोप चुकीचे आहेत कारण या वयाच्या कोणत्याही व्यक्तीवर यापूर्वी ईशनिंदाचा आरोप लावण्यात आलेला नाही. मानवाधिकार संघटना पाकिस्तानच्या अशा कायद्यावर बऱ्याच काळापासून टीका करत आहेत. कारण या मुस्लिम बहुल देशात अशा कायद्याचा धार्मिक अल्पसंख्यांकांविरूद्ध गैरवापर केला गेला आहे.