बोत्स्वाना (Botswana) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) मधील जवळपास 300 हत्तींचा जिवाणू संसर्गाशी निगडीत कारमामुळे मृत्यू (Elephants Killed By Rare Bacteria) झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. बोत्सवानाच्या ओकावांगो डेल्टामध्ये 350 हून अधिक हत्तींचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व घटना साधारण 2020 च्या दरम्यान घडल्या आहेत. या हत्तींची शिकार झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, हत्तींची शिकार झाल्याच्या कोणत्याच खुणा आढळून येत नाहीत. हत्तींचे सर्व अवयव शाबूत असल्याने शिकारीची शक्यता फेटाळून लावण्यात येत आहे. त्यामुळे एका विशिष्ठ कालावधीत अशा प्रकारे हत्तींचा मृत्यू व्हावा याबाबत वन्यसंशोधक आणि वैज्ञानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आश्चर्य व्यक्त होत आहे. घडल्या प्रकारामुळे वनसंशोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,पीडित हत्तींमध्ये नर आणि मादी अशा दोन्ही लैंगिक आणि सर्व वयोगटातील हत्तींचा समावेश आहे. मृत्यू होण्यापूर्वी हत्ती उभ्याउभ्याच कोसळतात, काही प्रकरणांमध्ये ते पुढच्या बाजूला तोंडावर (कपाळावर) कोसळलात. वनअधिकारी आणि अभ्याकांनी जवळपास 35 हत्तींच्या बाबतीत हे निरीक्षण नोंदवले आहे.
द गार्डियनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बोत्सवाना येथे झालेल्या हत्तींच्या मृत्यूचा संबंध अनिर्दिष्ट सायनोबॅक्टेरियल टॉक्सिनशी तात्पूरत्या स्वरुपात जोडला गेला होता. या मृत्यूमागे विशेष कोणतेही कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले नव्हते. तसेच, नेमकेपणाने स्पष्टीकरणही अधिकाऱ्यांना देता आले नव्हते. दरम्यान, झिम्बाब्वेमधील हत्तींवर अलीकडील काळात झालेल्या चाचणीमुळे हत्तीच्या मृत्यूबाबत माहिती पुढे आली आहे. झिम्बाब्वेमधील हत्तीच्या मृत्यूचे कारण तुलनेने अस्पष्ट जीवाणू आहे. ज्याला Pasteurella bisgaard taxon 45 म्हणून ओळखले जाते. या जीवाणूमुळे हत्तींना सेप्टिसीमिया हा गंभीर मानला जाणारा रक्त संसर्ग झाला. परिणामी त्यांचा मृत्य झाला.
नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार, अशाप्रकारचा जीवाणूजन्य संसर्ग होऊन हत्तींचा कधीही मृत्यू झाला नव्हता. आता हा संसर्ग विशिष्ठ प्रजातीच्या हत्तींमध्ये झाल्याने आगोदरच संख्येने कमी असलेल्या आणि लुप्त होत चाललेल्या हत्तींच्या आरोग्याविषयी चिंता निर्माण करते. व्हिक्टोरिया फॉल्स वाइल्डलाइफ ट्रस्ट, युनिव्हर्सिटी ऑफ सरे आणि दक्षिण आफ्रिकेतील संशोधन प्रयोगशाळा यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय संघाचा समावेश असलेल्या संस्था आणि त्यांच्या अहवालांतून हत्तीच्या मृत्यूबद्दल चिता व्यक्त होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, यूके सरकारच्या प्राणी आणि वनस्पती आरोग्य एजन्सी (APHA) च्या तज्ञांनी देखील संशोधनात योगदान दिले आहे.
आफ्रिकन सवाना हत्ती यांची प्रजाती आगोदरच कमी होत चालली आहे. ही प्रजाती प्रतिवर्ष 8% घसरणीचा सामना करत आहे. शिकार हे या घटत्या प्रमाणाचे प्रमुख कारण आहे. सध्यास्थितीत केवळ 350,000 इतकेच ज्ञात हत्ती जंगलात उरले असल्याची माहिती आहे. त्यातच त्यांना संसर्गजन्य आजाराचा समाना करावा लागला तर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटू शकते.