Pak PM Shehbaz Sharif (PC - Wikimedia commons)

गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तान (Pakistan) मोठ्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. आता पाकिस्तानमधील आर्थिक संकटाचा परिणाम रमजानमध्येही (Ramadan 2023) दिसून येत आहे. देशात डझनभर केळीचा भाव 500 रुपयांवर पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये सध्या द्राक्षे 1600 रुपये किलो दराने विकली जात आहेत. केळी, द्राक्षे यांच्यासह इतर दैनंदिन वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. कांद्याचे भाव 228.28 टक्क्यांनी वाढले आहेत. आर्थिक संकटापासून आतापर्यंत पिठाच्या किमती 120.66 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये डीझेल 102.84 टक्के तर पेट्रोल 81.17 टक्के महागले आहे.

पाकिस्तानात फळे आणि इतर वस्तूंच्या भाववाढीचे कारण हे गेल्या वर्षी आलेला पूर समजले जात आहे. या पुरात पाकिस्तानचा दोन तृतीयांश भाग बुडाला होता. पुरामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कराची, रावळपिंडी, इस्लामाबाद आणि लाहोरसारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई आहे. महागाईमुळे लोक कमी माल घेत असल्याचे मोठ्या बाजारातील दुकानदारांचे म्हणणे आहे.

अहवालात म्हटले आहे की, 17 मार्च 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $10.14 अब्ज झाला आहे. सध्या चालू असलेल्या आर्थिक संकटामुळे आणि आयएमएफ कर्जाच्या अडथळ्यामुळे आपल्या देयकांचा समतोल राखण्यासाठी पाकिस्तानला सध्या परकीय चलनाच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. (हेही वाचा: Silicon Valley Bank Sold: First Citizens Bank ने विकत घेतली Silicon Valley Bank; $500 Million चा व्यवहार)

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) गरीब पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी अनेक अटी घातल्या आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून पाकिस्तान आणि आयएमएफ यांच्यात 1.1 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याबाबत चर्चा सुरू आहे. हा निधी आयएमएफने मंजूर केलेल्या $6.5 बिलियन बेलआउट पॅकेजचा भाग आहे. आयएमएफने हे कर्ज दिल्यास पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळू शकते. आयएमएफकडून कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानने अनेक आर्थिक बदल केले आहेत. यामध्ये विजेवर कर लादले आहे, इंधनाच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. इतर अनेक करांमध्येही वाढ केली आहे.