Pakistan Abdali Missile Test (फोटो सौजन्य - X/@Defense_Talks)

Pakistan Abdali Missile Test: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने शनिवारी अब्दाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी (Pakistan Abdali Missile Test) केल्याचा दावा केला. सोनमियानी रेंजमध्ये पाकिस्तानने या क्षेपणास्त्राची चाचणी (Missile Test) घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या क्षेपणास्त्राची मारा क्षमता 450 किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या क्षेपणास्त्राची चाचणी लष्करी सराव अंतर्गत करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, या प्रक्षेपणाचे उद्दिष्ट सैन्याची ऑपरेशनल तयारी सुनिश्चित करणे आणि क्षेपणास्त्राची प्रगत नेव्हिगेशन प्रणाली आणि वाढीव गतिशीलता वैशिष्ट्यांसह प्रमुख तांत्रिक बाबींचे प्रमाणीकरण करणे होते. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने उचलली कठोर पावले; पाकिस्तानी जहाजांना बंदरात प्रवेश बंदी, पत्रे आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित)

दरम्यान, भारताने शनिवारी पाकिस्तानविरुद्ध मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणतीही वस्तू पाकिस्तानातून भारतात येणार नाही आणि भारतातून कोणतीही वस्तू पाकिस्तानला पाठवली जाणार नाही. सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, आता पाकिस्तानमधून आयात-निर्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. (हेही वाचा: Pahalgam Attack: पाकिस्तानला आणखी एक झटका! पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक)

पाकिस्तान अब्दाली क्षेपणास्त्र चाचणी व्हिडिओ - 

पाकिस्तानसोबतचे अप्रत्यक्ष व्यापार बंद -

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने यापूर्वी थेट व्यापार थांबवला होता. पण आता सरकारने सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष व्यापार देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. वाणिज्य मंत्रालय आता अशा उत्पादनांची यादी देखील तयार करत आहे जे यापुढे भारतातून आयात किंवा निर्यात केले जाणार नाहीत.