सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरस (Coronavirus) या महामारीचा सामना करीत आहे. कोणत्याही सोयी सुविधेपेक्षा लोकांचा जीव महत्वाचा असल्याने अनेक देशांत लॉक डाऊनचे काटेकोरपणे पालन होत आहेत. मात्र याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. या साथीच्या आजारामुळे जगभरातील शाळा, कॉलेजेस बंद आहेत. अशात युनेस्कोने (UNESCO) म्हटले आहे की, जगभरात कोरोना विषाणूमुळे शैक्षणिक संस्था बंद पडल्यामुळे तब्बल 154 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम मुलींवर होईल कारण, यामुळे शाळा सोडण्यात येणाऱ्या मुलींची संख्या वाढेल. तसेच शिक्षणामध्ये मुला-मुलीमधील भेदभावही वाढेल.
युनेस्कोच्या सहाय्यक महासंचालक-शिक्षण-स्टीफानिया गियानिनी (Stefania Giannini) यांनी 'पीटीआय-भाषा'ला सांगितले की, कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे शाळा बंद झाल्याने शिक्षण अर्ध्यावर सुटण्याचे प्रमाण वाढेल, ज्याचा परिणाम मुलींवर सर्वात जास्त होईल. इतकेच नाही तर आणि लैंगिक अत्याचार, अकाली गर्भधारणा आणि बाल विवाह यांचेही प्रमाण वाढण्याचा धोका आहे.
जगभरात शिक्षणासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येपैकी, कोरोना व्हायरसमुळे जवळ जवळ 89 टक्क्यांहून अधिक मुले शाळेत जाऊ शकत नाहीत असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. यामध्ये शाळा किंवा विद्यापीठात नोंदणीकृत 154 कोटी विद्यार्थ्यांची संख्या असून, त्यामध्ये सुमारे 74 कोटी मुलींचा समावेश आहे. यापैकी 11 कोटीहून अधिक मुली या जगातील सर्वात कमी विकसित देशांमध्ये राहत आहेत जिथे शिक्षण घेणे हा फार मोठा संघर्ष आहे. निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या मुलींची स्थिती तर अजून वाईट होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Fact Check: कोरोनामुळे युपीएससी, एमपीएससी परीक्षा रद्द केल्याची माहिती खोटी, PIB महाराष्ट्र यांच्याकडून खुलासा)
गियानिनी पुढे म्हणतात, ‘जेव्हा सरकार अनिश्चित काळासाठी शाळा बंद ठेवण्याची तयारी करते, तेव्हा पॉलिसी तयार करणाऱ्या लोकांनी तसेच प्रॅक्टिशनर्सनी आपल्या भूतकाळातील संकटाच्या धड्यांमधून काहीतरी शिकून मुलींना भेडसावणाऱ्या समस्या निवारण करण्यासाठी उपयोजना करणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही झगडून मुलींच्या शिक्षणासाठी जी प्रगती केली आहे त्याचे रक्षण करण्याची विनंती करतो.’