Fact Check: MPSC and UPSC Exam (Photo Credits-Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने दिवसेंदिवस रुग्णांचा संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. मात्र शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद राहणार असल्याने त्यांच्या परिक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर आता कोरोनाची परिस्थिती पाहता युपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC ) परीक्षा रद्द होणार असल्याची बातमी खोटी असल्याचा खुलासा आता PIB महाराष्ट्र यांनी केला आहे.

एका मराठी टीव्ही चॅनलने कोरोनामुळे युपीएससी आणि एमपीएससी परिक्षा रद्द होणार असल्याची बातमी दाखवली. मात्र ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण पीआयबी महाराष्ट्र यांनी दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, युपीएससी आणि एमपीएससी परिक्षांचे वेळापत्रक गरज वाटल्यास बदलण्यात येईल. तसेच या संदर्भातील अधिक माहिती आणि सुचना युपीएससीच्या संकेतस्थळावर दिली जाईल असे म्हटले आहे.(कर्मचारी निवड आयोगाच्या परिक्षांच्या नव्या तारखा 3 मे नंतर ठरणार, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोठा निर्णय)

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा होणार की नाही याबद्दल साशंकता होती. जर यावर्षी कोरोनामुळे या परीक्षा रद्द झाल्या, तर या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. त्यांच्यावर अन्याय होईल, असे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते.