आर्थर अश्किन, गेरार्ड मौरो आणि डोना स्ट्रिकलँड (Photo Credits: File Image)

दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण जगाचे लक्ष प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्कारांवर लागले आहे. या आठवड्यात नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे. नुकताच भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अमेरिकेतील आर्थर अश्किन, फ्रान्सचे गेरार्ड मौरो आणि कॅनडाच्या डोना स्ट्रिकलँड, यांना विभागून लेझर फिजिक्स या विषयात केलेल्या अतुलनीय कामाबद्दल यंदाचा हा पुरस्कार देण्यात आला आहे. या तिघांच्या संशोधनामुळे प्रकाशाची किरणे डोळ्यांच्या सर्जरीपासून मायक्रो-मशीनपर्यंत उपकरणासारखी वापरली जाऊ लागली. तसेच या लेजर किरणांचा वापर करून अतिशय कठीण जमीन किंवा भूपृष्ठ फोडले जाऊ शकतात.

या पुरस्काराच्या निमित्ताने जगातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेलमध्ये भौतिकशास्त्रात यंदा तब्बल 55 वर्षांनतर एका महिलेची वर्णी लागली आहे. कॅनडातील ओंटारियो विद्यापीठाच्या संशोधक स्ट्रिकलँड या 55 वर्षानंतर नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ बनल्या आहेत. याआधी 1963 मध्ये न्युक्लियर स्ट्रक्चर शोधासाठी मारिया मेयर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते

अमेरिकेचे अश्किन यांना नोबेल पुरस्काराची अर्धी रक्कम दिली जाणार आहे. तर उर्वरित अर्धी रक्कम अन्य दोघा विजेत्यांना दिली जाणार आहे.

सोमवारी औषधशास्त्र विषयातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर, आता भौतिकशास्त्रासाठीचे नावे जाहीर करण्यात आले आहेत. आठवडाभर विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे. गेल्या 70 वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.