Maldive | (फोटो सौजन्य: डीडी न्यूज)

भारतासोबतचे द्वपक्षीय संबंध अधिक दृढ व्हावेत, असे मालदीव सरकार आणि देशातील अनेक नेत्यांना वाटते. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात मालदीवच्या निलंबित उपमंत्र्यांनी केलेली टीका आणि वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर या मंत्र्यावर कारवाई व्हावी, असा सूर उमटत आहे. अशा प्रकारची वक्तव्ये, घटना दोन देशांमध्ये तणाव निर्माण करतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपाययोजना करण्यात यावी, असे मालदीवच्या काही नेत्यांनी (Maldivian Leaders) म्हटले आहे. त्यानंतर मालदीव सरकारवर दबाव (Maldivian Government) वाढला आहे. मालदीवमधील प्रमुख नेत्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे, काहींनी अविश्वास प्रस्ताव आणण्यासह सदर उपमंत्र्याविरोधात निर्णायक कृती करण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

भारत मालदीवचा मैत्रीपूर्ण शेजारी

माजी उपाध्यक्ष अहमद अदीब यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्ताधारी पीएमसी-पीपीएम युतीमध्ये अतिरेकी घटकांच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले. दरम्यान, संसद सदस्य (MDP) मिकाइल नसीम यांनी परराष्ट्र मंत्री मूसा जमीर आणि निलंबित अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. नॅशनल बोटिंग असोसिएशन, मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री, नॅशनल हॉटेल्स अँड गेस्ट हाऊस असोसिएशन आणि इतरांनी निलंबित मालदीव मंत्र्यांच्या कृतीचा निषेध करणारी निवेदने जारी केली आहेत. त्यांनी भारताबद्दल भूमिका व्यक्त करताना एक जवळचा आणि मैत्रीपूर्ण शेजारी, संकटकाळात प्रथम प्रतिसाद देणारा आणि कोविड-19 महामारीनंतर एक महत्त्वपूर्ण मदत प्रदाता म्हणून भारताचा उल्लेख केला. दरम्यान, मालदीवचे उपमंत्री मिकेल नसीम यांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध अपमानजनक टिप्पणी केली होती. या टिप्पणीची जबाबदारी सदर मंत्र्याने स्वीकारावी. तसेच, या वक्तव्यावर मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांनी वक्तव्य द्यावे अशीही मागणी तेथील नेत्यांनी केली आहे. डीडी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Maldives Association of Tourism Industry On PM Modi: मालदीव्ह टुरिझम बॉडी कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध आक्षेपार्ह विधानाचा निषेध!)

द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न

मालदीवच्या एका उपमंत्र्याने कॅबिनेट सदस्य आणि सरकारी अधिकाऱ्यांसमवेत पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या नुकत्याच दिलेल्या भेटीबद्दल निंदनीय टिप्पणी केल्याने वाद सुरू झाला. या टिप्पण्या, नंतर हटविल्या गेल्या. मात्र, राजकीय वर्तुळात या घटनेमुळे चांगलाच संताप व्यक्त होऊ लागला. मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी भारताविरुद्ध 'द्वेषपूर्ण भाषा' वापरल्याचा निषेध केला. तसेच मालदीवसोबत भारताची असलेल्याविशेष आणि दीर्घकालीन मैत्रीची पुष्टी केली. या घटनेने मालदीव आणि भारत यांच्यातील संबंधांबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला ताण-तणावाचे वातावरण निवळून उभय देशांमधील संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी भावना व्यक्त केली जाऊ लागली आहे.