Nepal Landslide | (Photo Credits: ANI/X)

भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळमध्ये शुक्रवारी (12 जुलै) पहाटे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन (Nepal Landslide) झाले. या दुर्घटनेत सात भारतीय नागरिकांना (Indian Nationals) आपले प्राण गमवावे लागले. प्राप्त माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तीची (Natural Disaster) ही घटना नेपाळच्या चितवन जिल्ह्यात नारायणघाट-मुगलिंग रस्त्यालगतच्या सिमलताल परिसरात घटना घडली. येथील त्रिशूली नदीला मोठा पूर आला. ज्यामुळे दोन बस जमीन खचल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. मदत आणि बचाव कार्य (Rescue Operations) सुरु आहे.

मदत, शोध आणि बचावाचे प्रयत्न सुरू

नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. ज्याचा फटका दोन प्रवासी बसला बसला. सांगितले जात आहे की, वाहून गेलेल्या बसमध्ये 65 प्रवासी होते. त्यापैकी अनेक जण आता बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मायरिपब्लिका या नेपाळी न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, शोध आणि बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. सात मृत भारतीयांना घेऊन जाणारी एक बस बीरगंजहून काठमांडूला जात होती. तिसुद्धा पाण्याच्या प्रवाहात ओढळी गेल्याने सातही जणांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे रस्ते विभागाने 15 दिवसांपासून नारायणघाट-काठमांडू रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे वाहतूक तात्पुरती पूर्ववत करण्यात आली होती. तोच धोका पत्करणे अंगाशी आले आणि बसवर दरड कोसळली. (हेही वाचा, Nepal: माउंट एव्हरेस्टवरून सुटका करण्यात आलेल्या भारतीय गिर्यारोहकाचा नेपाळमध्ये मृत्यू)

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस

चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये भूस्खलन झाले. परिणामी अनेक रस्ते आणि महामार्ग बंद झाले आहेत. बस महामार्गावरून प्रवास करत असताना दरड कोसळली, त्या रस्त्याच्या कडेला आणि खाली नदीत ढकलल्या. दोन्ही बसमध्ये चालकांसह एकूण 65 लोक होते. आम्ही सध्या घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे. तथापि, संततधार पावसामुळे हरवलेल्या बसेस शोधण्यात अडथळे येत आहेत. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. भूस्खलनाच्या ढिगाऱ्यांमुळे नारायणघाट-मुगलिंग मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे, असेही ते म्हणाले.

नेपाळच्या पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त

दरम्यन, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि सरकारी यंत्रणांना शोध आणि बचाव कार्ये जलद करण्याचे निर्देश दिले. नेपाळ पोलीस आणि सशस्त्र दलाचे जवान बचाव कार्यात मदत करण्यासाठी घटनास्थळी आहेत.

नेपाळमध्ये अशा प्रकारचे भूस्खलन नवे नाही. पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना नेपाळच्या विविध भागांमध्ये वारंवार घडताना पाहायला मिळते. डोंगराळ भाग, चढणीचा आणि घाटांचा, वेडीवाकडी वळणे असलेला रस्ता, चालकांनी वाहन हाकताना पत्करलेला धोका आणि निसर्गाचे रौद्ररुप यांमुळे अनेकदा भूस्खलनाच्या घटानेत जीवितहानी झाल्याचे पाहायाल मिळते.