'More Transmissible Strain' of Coronavirus: चिंता वाढली! अवघ्या आठवड्याभरात सापडला कोरोनाचा दुसरा स्ट्रेन; पहिल्यापेक्षा अधिक संसर्गजन्य
Coronavirus (Photo Credits: PTI)

जग अजूनही कोरोना व्हायरसशी (Coronavirus) झुंज देत आहे. आतापर्यंत कोट्यावधी लोक संक्रमित झाले, लाखो लोकांचा जीव गेला परंतु हा विषाणू अजूनतरी नियंत्रणात आला नाही. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये (Britain) या विषाणूचे एक नवीन रूप (New Strain) समोर आले होते. या नवीन स्ट्रेनने इतर देशांच्याही चिंता वाढवल्या आहेत, अशात आता कोरोना विषाणूचा एजून एक नवीन स्ट्रेन आढळला आहे. या नवीन स्ट्रेनमुळे सध्या ब्रिटनमधील लॉकडाऊन अजून सक्त करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये दक्षिण आफ्रिकेहून प्रवास केलेल्या प्रकरणांच्या संपर्कात कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार सापडला आहे. आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक (Matt Hancock) यांनी बुधवारी ही माहिती दिली.

ब्रिटनने बुधवारी हा नवीन स्ट्रेन सापडल्याचे जाहीर केले. हा दुसरा नवीन स्ट्रेन पहिल्यापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिन मॅट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, यूकेमध्ये या नवीन स्ट्रेनच्या 2 घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्वांनी त्वरित स्वतःला आयसोलेट करावे असे आवाहन केले गेले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, कोरोना व्हायरसचे नवीन जनेटीक म्युटेशन आढळले आहे. कदाचित वाढणाऱ्या कोरोना संसर्गास हाच स्ट्रेन जबाबदार असू शकतो.

याआधी सापडलेल्या नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी ब्रिटन धडपडत आहे. तो स्ट्रेन 70 टक्के अधिक संक्रमणीय असल्याचे सांगण्यात आले होते. आता अवघ्या आठवड्याभरात कोरोनाचा अजून एक स्ट्रेन आढळून आला असून तो पहिल्या स्ट्रेनपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे दिसून आले आहे. यामुळे ब्रिटनसमोरील समस्या अजून वाढल्या आहेत. (हेही वाचा: अखेर Antarctic खंडातही पोहोचला कोरोना विषाणू; आता जगातील सातही खंडांमध्ये Coronavirus चा शिरकाव)

आरोग्य सचिव म्हणाले की, कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट आढळलेल्या लोकांच्या जवळच्या संपर्कातील इतर लोकांनाही वेगळे ठेवण्यात आले आहे. गेल्या पंधरवड्यात दक्षिण आफ्रिकेत प्रवस केलेल्या सर्वांनाही वेगळे ठेवले गेले आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर त्वरित निर्बंध घातले जात असल्याचेही सचिव म्हणाले.