कोरोना विषाणूचे (Coronavirus) वाढत असलेले प्रमाण, त्यात लस अथवा औषध उपलब्ध नाही, लॉक डाऊन (Lockdown) मुळे व्यवसाय ठप्प, अशा अनेक गोष्टी एक संकट बनून जगासमोर उभ्या आहेत. एकीकडे या गोष्टींचा सामना करण्यात देश व्यस्त आहेत, अशात संयुक्त राष्ट्राने (UN) एका नव्या संकटाबद्दल भीती व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 5 एजन्सींनी एक सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये असे समोर आले आहे की जगातील प्रत्येक 9 पैकी एक व्यक्ती भुकेला (Hungry) राहु शकेल. हवामान बदलांमुळे सतत होणारे वातावरणामधील बदल तसेच जगाच्या निरनिराळ्या भागातील आर्थिक मंदीमुळे, 2014 पासून उपासमारीची आकडेवारी आणखीनच बिघडू लागली होती. हे असे वर्ष होते जेव्हा अनेक दशकांत जागतिक स्तरावर भुकेल्यांच्या संख्येत प्रथमच वाढ झाली.
संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, जगभरात उपासमारीला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढून 690 दशलक्ष होईल असा अंदाज वर्तवला आहे. गेल्या सात महिन्यांत या संख्येमध्ये 10 दशलक्ष इतकी वाढ झाली आहे आणि 2014 पासून यामध्ये 60 दशलक्ष इतकी वाढ झाली आहे. अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की, कोविड-19 च्या उद्रेकामुळे हे उपासमारीचे संकट आणखीनच वाढेल. अशावेळी आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत, तर येत्या काही महिन्यांत उपासमारीच्या पीडितांमध्ये मोठी वाढ होऊ शकते, असे युएनने सांगितले आहे.
हा अहवाल अन्न व कृषी संघटना, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, संयुक्त राष्ट्र बाल निधी, जागतिक अन्न कार्यक्रम आणि जागतिक आरोग्य संघटना, यूएनच्या पाच एजन्सींनी तयार केला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 10 देशांना या संकटाचा सामना करावा लागला होता. आर्थिक संकट आणि हवामान बदलांमुळे तीव्र अन्नटंचाईचा धोका उद्भवला होता. यामध्ये यमन, व्हेनेझुएला, दक्षिण सुदान आणि नायजेरिया अशा काही देशांचा समावेश होतो. 2020 मध्ये, येमेनला सर्वात भयानक अशा अन्न संकटाचा सामना करवा लागू शकतो.