Cyber Crime (फोटो सौजन्य - Pixabay)

Govt Advisory On Job Fraud: कंबोडिया हा दक्षिणपूर्व आशियाई देश आहे. ज्यात जवळपास ५००० भारतीय नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे. ज्यामध्ये, सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून आतापर्यंत 250 नागरिकांची सुटका करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांत 75 भारतीयांना परत आणल्याची माहिती आहे. अनेक भारतीयांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देण्याचे आमिष (Cambodia Job Fraud) दाखवून कंबोडियात नेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडून गैरप्रकार (malpractice) करवूण घेण्यात आले. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरून भारतीयांविरुद्ध सायबर फसवणूकीची कामे करवूण घेण्यात आली. (हेही वाचा :Cambodia Cyber Slaves: नोकरी, पैसा याच्या नावाखाली ऑनलाईन क्राईम; कंबोडियामध्ये हजारो नागरिक बंदीवान; बनवले सायबर गुलाम )

ही प्रकरणे समोर येताच कंबोडियात नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी आता परराष्ट्र मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कंबोडियात नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांनी अधिकृत एजंटमार्फतच तेथे जाण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. तसेच, कंबोडियामध्ये तुम्ही जिथे काम करणार आहात त्या कंपनीची संपूर्ण माहिती तिथे जाण्याआधी गोळा करा, असे सांगण्यात आले आहे. सध्या भारतीय परराष्ट्र मंत्रालय, कंबोडियातील आपल्या दूतावासाद्वारे, कंबोडियाच्या अधिकाऱ्यांसोबत या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

नक्की काय प्रकरण आहे?

भारतीयांना डेटा एंट्री किंवा इतर सोप्या पण प्रचंड पगारांच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवले जाते. पण कंबोडियात पोहोचल्यावर त्यांना धमकावले जाते आणि ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जाते. या फसवणुकीत बनावट सोशल मीडिया खाती तयार करणे आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांची फसवणूक करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्याशिवाय, धक्कादायकबाब म्हणजे जर या लोकांनी टार्गेट पूर्ण केले नाही तर त्यांना उपाशी ठेवले जात होते. त्यांना खाण्यापिण्यासारख्या मूलभूत सुविधाही दिल्या जात नव्हत्या.

किती भारतीय अडकले?

कंबोडियामध्ये या सापळ्यात जवळपास 5,000 भारतीय अडकले आहेत. ओडिशाच्या राउरकेला पोलिसांनी डिसेंबर २०२३ मध्ये सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला तेव्हा फसवणूक उघड झाली. या टोळीतील ८ जणांना अटक करण्यात आली असून ते भारतीयांना कंबोडियात पाठवायचे.

फक्त कंबोडियात अशा घटना घडतात?

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशात जाण्यासाठी असे बनावट नोकरीचे घोटाळे अनेक देशांत समोर आले आहेत. यामध्ये पूर्व युरोप, आखाती देश, मध्य आशियाई देश, इस्रायल, कॅनडा, म्यानमार आणि लाओस या देशांचा समावेश आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना सल्ला

परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी कंपनीबाबत चौकशी करावी, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. अधिकृत एजंटांमार्फतच परदेशात जाण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही ज्या कंपनीत काम करणार आहात त्या कंपनीची संपूर्ण माहिती गोळा करा.