कॅरिबियन बेटांचा प्रमुख देश असलेल्या बार्बाडोसमधील (Barbados) राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांची राजवट संपुष्टात आली आहे. म्हणजेच राणी एलिझाबेथ द्वितीय यापुढे या देशाच्या सार्वभौम राहणार नाहीत. एकूणच, बार्बाडोसमधील वसाहतीचा काळ संपुष्टात आला आहे. हा देश आता पूर्ण प्रजासत्ताक झाला आहे. 72 वर्षीय सँड्रा मेसन या 2018 पासून बार्बाडोसच्या गव्हर्नर जनरल होत्या. गेल्या महिन्यात संसदेत पारित झालेल्या ठरावात त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि आता राणीच्या जागी बार्बाडोस राज्याच्या प्रमुखपदी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेसन या वकील आणि न्यायाधीश देखील आहेत. त्यांनी व्हेनेझुएला, कोलंबिया, चिली आणि ब्राझीलमध्ये राजदूत म्हणूनही काम केले आहे.
मंगळवारी रात्री त्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशा प्रकारे, बार्बाडोस ब्रिटनपासून वेगळे होईल आणि 55 वा प्रजासत्ताक देश बनेल. पहिले इंग्लिश जहाज साधारण 400 वर्षांपूर्वी या कॅरिबियन बेटावर पोहोचले होते. तेव्हापासून तिथे इंग्लंडची सत्ता होती. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मध्यरात्री राजधानी ब्रिजटाऊनमधील चेंबरलेन ब्रिजवर नवीन प्रजासत्ताकच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी जमली होती. यावेळी हिरोज स्क्वेअरवर 21 तोफांची सलामी देण्यात आली आणि बार्बाडोसचे राष्ट्रगीत गायले गेले.
जेव्हा राणी एलिझाबेथचा शाही दर्जा त्यागला जात होता आणि नवीन बार्बाडोसची घोषणा केली जात होती तेव्हा ब्रिटीश सिंहासनाचे वारस प्रिन्स चार्ल्स तिथे उपस्थित होते. समारंभात, बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटले यांनी जाहीर केले की अध्यक्ष गायिका रिहानाला ‘राष्ट्रीय नायक’ म्हणून घोषित करतील. यापूर्वी 2018 मध्ये रिहानाची बार्बाडोसची राजदूत म्हणून घोषणा करण्यात आली होती. या वर्षी 33 वर्षीय रिहानाला फोर्ब्स मॅगझिनने जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार घोषित केले आहे. (हेही वाचा: Kim Jong Un यांच्यासारखी नागरिकांनी नक्कल करु म्हणून नॉर्थ कोरियात Leather Coat वर बंदी)
सत्तापरिवर्तनाच्या निमित्ताने ब्रिटिश राजसत्तेला अंतिम सलामी देण्यात आली असून राजघराण्याचा झेंडा उतरवून बार्बाडोसचा नवा ध्वज फडकवण्यात आला आहे. बार्बाडोस 1966 मध्ये ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झाला होता. बार्बाडोसच्या आधी 1992 मध्ये मॉरिशसने राणीला राज्याच्या प्रमुख पदावरून हटवले होते. महाराणी एलिझाबेथ II अजूनही युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि जमैकासह 15 देशांच्या प्रमुख आहेत. बार्बाडोसने कॉमनवेल्थचा भाग बनून राहण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये 54 आशियाई, आफ्रिकन, युरोपियन आणि अमेरिकन देशांच्या समूहावर एकेकाळी ब्रिटिश राजघराण्याने राज्य केले होते.