Zimbabwe Kids (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्रसिद्ध अर्थतज्ञ स्टीव्ह हँके (Steve Hanke) यांच्या वार्षिक दुःखद निर्देशांकानुसार (Annual Misery Index) झिम्बाब्वे (Zimbabwe) हा सर्वात दयनीय देश म्हणून समोर आला आहे. हा अहवाल प्रामुख्याने सर्व देशांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे ठरवला जातो. हे निर्देशांक म्हणजे वर्षअखेरीची देशातील बेरोजगारी, महागाई आणि बँक-कर्ज दरांची बेरीज आहे. झिम्बाब्वेने युक्रेन, सीरिया आणि सुदान सारख्या युद्धग्रस्त देशांना मागे टाकले आहे. हा देश प्रामुख्याने गगनाला भिडणाऱ्या महागाईने त्रस्त आहे. झिम्बाब्वेमधील महागाई गेल्या वर्षी 243.8 टक्क्यांवर पोहोचली आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, या क्रमवारीसाठी एकूण 157 देशांचे विश्लेषण करण्यात आले.

स्टीव्ह हँके यांनी ट्विट केले की, ‘अश्‍चर्यकारक महागाई, उच्च बेरोजगारी, जास्त कर्जदर आणि अतिशय कमकुवत जीडीपीमुळे झिम्बाब्वे हांके 2022 वार्षिक दुःखाच्या निर्देशांकात जगातील सर्वात दयनीय देश ठरला आहे.’

हांके यांनी झिम्बाब्वेमधील सत्ताधारी राजकीय पक्ष, ZANU-PF आणि त्यांच्या धोरणांना देशातील मोठ्या विनाशासाठी जबाबदार धरले. व्हेनेझुएला, सीरिया, लेबनॉन, सुदान, अर्जेंटिना, येमेन, युक्रेन, क्युबा, तुर्की, श्रीलंका, हैती, अंगोला, टोंगा आणि घाना हे सर्वात दयनीय देशांच्या पहिल्या 15 देशांच्या यादीत आहेत. सध्या आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान जगातील सर्वात दयनीय देशांच्या यादीत 35 व्या क्रमांकावर आहे. ज्यासाठी देशातील महागाई हा सर्वात जास्त योगदान देणारा घटक ठरला आहे. (हेही वाचा:  ऐकावे ते नवलंच! महिलेचा विचित्र व्यवसाय; चक्क थुंकी विकून महिन्याला करत आहे लाखो रुपयांची कमाई, कर्ज फेडले, फ्लॅट खरेदी केला)

दुसरीकडे या यादीत स्वित्झर्लंड सर्वात खाली आहे, म्हणजेच तेथील नागरिक सर्वात आनंदी आहेत. स्वित्झर्लंडनंतर दुसऱ्या क्रमांकाचा आनंदी देश म्हणजे कुवेत, त्यानंतर आयर्लंड, जपान, मलेशिया, तैवान, नायजर, थायलंड, टोगो आणि माल्टा यांचा नंबर लागतो. दुसरीकडे, भारत या यादीत 103 व्या क्रमांकावर आहे, ज्याचे म्हत्वाचे कारण बेरोजगारी हे आहे. यूएस या यादीत 134 व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये सलग सहा वर्षे जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला फिनलंड हा दयनीय देशांच्या यादीत 109 व्या क्रमांकावर आहे.