Afghanistan Crisis: अराजक अफगानिस्तान, सत्तातूर तालिबान; महागाई, रिकामी तिजोरी नव्या सत्ताधीशांसमोर  प्रचंड आव्हाने
Taliban. (Representational Image/ Photo Credit: PTI)

अमेरिकी सैन्य परत फिरले आणि अफगानिस्तान (Afghanistan) तालिबान (Taliban In Power) नेतृत्वाच्या ताब्यात आला. आता तालिबान (Taliban) अफगाणिस्तानमध्ये आज (3 सप्टेंबर) अधिकृत सत्ता स्थापन करत आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल तालिबान्यांनी 15 ऑगस्टला ताब्यात घेतले. त्यानंतर विजय साजरा करत तालिबानी आज सत्तासोपान चढत आहेत. तालिबान्यांनी सत्ता स्थापन करायचे ठरवले असले आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल असली तरी हे काम सोपे नाही. तालिबानसमोर बरीच मोठी आव्हाने (Big Challenges for Afghanistan) आहेत. ती त्यांना पेलावी लागणार आहेत. तालीबानच्या रुपात नव्या अफगानिस्तानसमोर असलेली (Big Challenges for Afghanistan) आव्हाने. घ्या जाणून.

तालीबान अफगानिस्तानची सूत्रे हातात घेतल्यापासून सांगत आहे की, परिस्थिती सर्वसामान्य आहे. नागरिकांनी घाबरु नये. नागरिकांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी हजर व्हावे. परंतू, असे असले तरी अद्यापही नागरिक कामावर परतताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यातून तालिबानचा क्रूर चेहरा पुढे आला आहे.

आर्थिक संकट

अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. बँका आणि एटीएम आदिंबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. लोक एटीएममधून अधिकाधिक पैसे काढू इच्छित आहेत. परंतू, एटीएममधून प्रतिदिन 200 डॉलर इतकेच पैसै नागरिकांना काढता येत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन

सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रदीर्घ काळापासून वेतनच मिळाले नाही. तसेच, चलनबदलाचाही फटका सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत आहे. अनेक ठिकाणी सरकारी चलन नाकारले जात आहे. त्यामुळे त्याचाही फटका सरकारी कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. खास करुन पाकिस्तानी सीमेवर ही समस्य अधिक दिसते आहे. (हेही वाचा, Afghanistan-Taliban Conflict: तालिबानने बंद केले काबुल विमानतळ; आता भीतीने देशालगतच्या सीमेकडे धावत आहेत लोक)

गोठलेला रिजर्व्ह

अफगानिस्तानवर तालिबानने कब्जा करताच अमेरिकेने रिजर्व्ह फंडावर निर्बंध घातले. त्यामुळे जवळपास नऊ कोटी डॉलर इतकी रक्कम देशाबाहेर आहे. त्यामळे ही रक्कम तालिबानच्या कब्जापासून कोसो दूर आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेही अफगानिस्तानातील कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्रीय संबध ठप्प

तालिबान सत्तेत आल्यापासून अफगानिस्तानचे एकदो देश वगळता जगभरातील देशांशी असलेले संबंध कमालिचे बिघडले आहेत. मनी ट्रान्सफरसारख्या सुविधांवरही मोठी मर्यादा आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपले दागिने, वस्तू विकून गुजराण करावी लागत आहे.

वाढती महागाई

तालिबान्यांच्या कब्जातील अफगानिस्तानसमोर महागाई ही मोठी समस्या आहे. भारत, युरोप यांसारखे तगडे देशही महागाईच्या चटक्यांसमोर हळहळतात तिथे अफगानिस्तानची अवस्था कशी असेल? याची कल्पनाही न केलेली बरी. अफागन नागरिकांना दैनंदिन खाद्यपदार्थांपासून वस्तूंपर्यंत संघर्ष करावा लागतो आहे. या वस्तूंच्या किमतींमध्ये तब्बल 50% वाढ झाली आहे.

भूकबळी

वाढती महागाई, अराजकता, नवी शासन यंत्रणा याचा थेट फटका नागरिकांच्या जीवनशैलीवर झाला आहे. त्यामुळे देशात भूकबळींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच, देशातील धान्याचे कोठारही काही काळातच रिकामे होण्याची शक्यता आहे. अशा वेळी भूकबळीची संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अफगानिस्तानातील नागरिक मोठ्या प्रमाणावर देश सोडू इच्छित आहेत. देशातील स्थिती पाहाता नागरिक हा निर्णय घेत आहेत. परंतू, तालिबानने देशाच्या बाहेर जाणाऱ्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी 'करा किंवा मरा' अथवा 'इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.'