
अमेरिकेने अफगाणिस्तान (Afghanistan) सोडल्यानंतर काबूलमधील (Kabul) परिस्थिती बिघडली आहे. अमेरिका देशातून बाहेर पडताच तालिबानने (Taliban) काबूल विमानतळ ताब्यात घेतला आहे आणि आता त्यांनी हे विमानतळ बंदही केले आहे. त्यानंतर भीतीने लोक देशालगतच्या सीमेकडे धावत आहेत, जेणेकरून तिथून ते देश सोडून जाऊ शकतील. अफगाणिस्तान हा लँडलॉक देश आहे आणि त्याची सीमा इराण, पाकिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी आहे. तालिबानच्या भीतीमुळे लोकांना आता या देशांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. सीमावर्ती भागात लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
अफगाणिस्तानात 20 वर्षांनंतर, अमेरिकन सैन्याने पूर्णपणे माघार घेतली आहे. यासह, तालिबानची एक नवीन इनिंग सुरू झाली आहे. आता तालिबानने अमेरिका आणि उर्वरित देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तालिबानचे सर्वोच्च प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी काबूल विमानतळाच्या धावपट्टीवर पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, मुजाहिदने अफगाणांना स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. मुजाहिद म्हणाले, 'या विजयासाठी अफगाणिस्तानचे अभिनंदन... हा विजय आपल्या सर्वांचा विजय आहे. हा अफगाणांचा विजय आहे.’
तालिबानच्या आगमनानंतर इथल्या आर्थिक संकटात लक्षणीय वाढ झाली आहे. काबूल विमानतळ हा एकमेव सुरक्षित मार्ग होता, ज्याद्वारे परदेशी संस्था मदत करू शकत होत्या. परंतु आता तेही बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानशी असणारी सीमा तोरखम बॉर्डर क्रॉसिंगवर तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले, ‘इथे मोठ्या संख्येने अफगाणी तोरखम गेट उघडण्याची वाट पाहत आहेत.’ देशभरातील बँकांबाहेर लोकांची गर्दी वाढत आहे, लोकांना स्वतःचे जमा केलेले पैसे देखील काढता येत नाहीत.
अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनी काबूलमधून 123,000 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. पण तरीही अजून हजारो लोक इथे अडकले आहेत. गेल्या आठवड्यात, ‘नेशन हाय कमीशन फॉर रिफ्यूजी’ म्हटले की परिस्थिती सुधारली नाही तर आणखी पाच लाख लोक अफगाणिस्तान सोडू शकतात. (हेही वाचा: अमेरिकेने अफगाणिस्थानातून सैन्य मागे घेतल्यावर तालिबान्यांनी केला जल्लोष साजरा, आता पुर्णपणे स्वातंत्र्याची केली घोषणा)
दरम्यान, यापूर्वी वृत्तसंस्था रॉयटर्सने दावा केला होता की, 23 जुलै रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि अशरफ घनी यांच्यात 14 मिनिटांचे संभाषण झाले. असे वृत्त आहे की, संभाषणादरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तानला लष्करी मदत देण्याबाबत चर्चा केली होती.