Life in Antarctica! निसर्गाचा चमत्कार; ब्रिटीश शास्त्रज्ञांना अंटार्क्टिकामध्ये पाण्याखाली 3000 फुटांवर अपघाताने सापडले जीव, Watch Video
Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

आतापर्यंत ओसाड समजल्या जाणार्‍या अंटार्क्टिकाच्या (Antarctica) एका कोपऱ्यात शास्त्रज्ञांना जीवन सापडले आहे. इथली परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी एखाद्या सजीव गोष्टीची कल्पना करणे अशक्य होते, परंतु आता लागलेला या जीवांचा शोध हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल. ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षणातील शास्त्रज्ञांना खडकाखाली दोन प्रकारचे Sea-Sponges सापडले आहेत. येथे ड्रिलिंग करणाऱ्या शास्त्रज्ञांनी बर्फाच्या खाली 900 मीटर अंतरावर बोअरहोलमध्ये कॅमेरा सोडला होता. त्या ठिकाणी हे जीव असल्याचे आढळले आहे. या शोधामुळे शास्त्रज्ञांना इतके आश्चर्य वाटले की त्यावर लिहिलेल्या रिसर्च पेपरचे नाव त्यांनी 'Breaking all the Rules' असे दिले आहे.

अंटार्क्टिकाची परिस्थिती अशी आहे की येथे जीवाची कल्पना करणे कठीण आहे. संपूर्णपणे बर्फाच्या चादरीने झाकून गेलेल्या या खंडातील जीवनाचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांना मोठे यश आले आहे. गडद अंधार, पाण्याचे तपमान -2.2 डिग्री सेल्सियस यामुळे येथे कोणत्याही प्रकारचे संशोधन करणे फार कठीण होते. आता प्रथमच स्थायी जीव येथे घर बनवताना आढळला आहे. विशेष गोष्ट अशी आहे की हे प्राणी त्यांच्या अन्नाच्या स्त्रोतापासून 200 मैल दूर आहेत, परंतु तरीही ते इथे जगत आहेत.

या जीवांच्या शोधाविषयीचा अहवाल फ्रंटियर्स इन मरीन सायन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, अंटार्क्टिकाच्या दक्षिण-पूर्वेकडील वेडेल सीमध्ये फिलचनर-रोन्ने आईस सेल्फ अंतर्गत हे जीव सापडले आहेत. यापूर्वी असे जीव कधीही सापडले नव्हते. अहवालात असे म्हटले आहे की हे प्राणी समुद्री बर्फाच्या दगडांवर चिकटून आहेत. ते कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत हे अजूनतरी कळले नाही, पण ते Sponges असल्याचे सांगितले जात आहे.

या प्राण्यांचा शोध लावणारे प्रमुख डॉ. हव्ह ग्रिफिथ म्हणतात की असे प्राणी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. ते थंड, गडद आणि बर्फाने भरलेल्या जगात स्वत: ला बदलत आहेत. त्यांच्याकडे या स्थितीत जगण्याची क्षमता आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जसे– हे जीव येथे कसे आले? ते काय खात असावेत? या ठिकाणी असे जीवन कितपत सामान्य आहे? या नवीन प्रजाती आहेत का? जर बर्फ कोसळला तर या समुदायाचे काय होईल? (हेही वाचा: शार्क मासे नष्ट होण्याचा धोका; 50 वर्षांत 70% जीव झाले कमी)

डॉ. ग्रिफिथ पुढे म्हणतात, दक्षिण समुद्रात तरंगणाऱ्या समुद्री हिमशैल्याखालचे जग अजूनही फारसे सापडलेले नाही. असे आइसबर्ग्स हे अंटार्क्टिका खंडातील 15 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतात. परंतु आतापर्यंत मानवांनी केवळ टेनिस कोर्टाइतक्या क्षेत्रावरच संशोधन केले आहे.