वाढती लोकसंख्या, प्रदूषण, वातावरणामधील बदल यामुळे केवळ पृथ्वीवरच परिस्थिती बिकट झाली नाही, तर सागरी जगाविषयीही धक्कादायक तथ्ये समोर येत आहेत. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की समुद्रात जास्त मासे पकडल्यामुळे शार्क फिश (Shark Fish) कायमचे संपू शकतात. या संशोधनानुसार, गेल्या 50 वर्षात 70 टक्के शार्क माशांचा मृत्यू झाला आहे. 1970 ते 2018 दरम्यान समुद्रात शार्क माशांच्या संख्येत 70 टक्के घट झाली आहे. नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार शार्क आणि रे माशांच्या 31 पैकी 24 प्रजातींना नष्ट होण्याचा धोका आहे, तर शार्कच्या तीन प्रजातींना सर्वात जास्त धोका आहे.
कॅनडामधील सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि युकेची युनिव्हर्सिटी ऑफ एक्सटेरच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार गेली 50 वर्ष ही शार्क लोकसंख्येसाठी अतिशय धोकादायक ठरली आहेत. 1970 पासून शार्क रे माशांची लोकसंख्या 71 टक्क्यांनी कमी झाल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात आढळले आहे. 84.7 टक्के शार्क माशांची लोकसंख्या घटली आहे. 1970 पासून मासेमारीवरील दबाव 18 पट वाढला आहे, ज्यामुळे समुद्राची इको-सिस्टम प्रभावित झाली आहे आणि बरेच जीव मोठ्या प्रमाणात अदृश्य होत आहेत.
शार्क आणि रे मासे अतिशय लवचिक हाडांपासून तयार होतात. त्यांची मुले लैंगिक परिपक्वतापर्यंत पोचण्यासाठी अनेक वर्षे लागतात, यासह त्यांच्यापासून फार कमी मुले जन्माला येतात. एकीकडे जगातील लोकसंख्या वाढत आहे व दुसरीकडे हवामानामध्ये बदल होत आहेत. या सर्वांचा शार्कच्या जीवनावर खोल परिणाम होत आहे. संशोधनात असे आढळले आहे की, हिंदी महासागसारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात हा जीव अधिक वेगाने मरत आहे. (हेही वाचा: गुरु ग्रहावरुन पाठविला गेला मेसेज? NASA च्या जूनो ने पकडला Wifi सारखा सिग्नल)
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की शार्क आणि रे माशांना वाचवण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. तज्ज्ञ डॉ. रिचर्ड शार्ले म्हणाले की, जर आता पावले उचलली गेली नाहीत तर ही परिस्थिती अधिक धोकादायक होऊ शकते. रिचर्ड यांनी असेही म्हटले आहे की, या प्रकरणात सरकारवर लोकांकडून दबाव आणण्याची गरज आहे.