Tardigrades (Photo Credits: Wikipedia)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) गगनयान मोहिमेसाठी 'मुख्य' अंतराळवीर म्हणून निवड झालेले ग्रुप कॅप्टन आणि भारतीय हवाई दलाचे (IAF) अधिकारी शुभांशू शुक्ला, पुढील मे महिन्यात नासाच्या अ‍ॅक्सिओम मिशन 4 च्या क्रूसोबत अंतराळात जाणार आहेत. अ‍ॅक्सिओम मिशन 4 चे नेतृत्व नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन करतील, ज्या अ‍ॅक्सिओम स्पेसच्या मानवी अंतराळ उड्डाण संचालक आहेत. आता अशी चर्चा आहे की विचित्र दिसणारे पाण्यातील अस्वलदेखील अंतराळात पाठवले जाणार आहे. इस्रो अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेसह वॉटर बेअर (Water Bears), ज्यांना टार्डिग्रेड्स (Tardigrades) असेही म्हणतात, अंतराळ स्थानकात पाठवत आहे.

अ‍ॅक्सिओम-4 हे एक खासगी अंतराळ मिशन आहे, जे इसरो, नासा आणि अ‍ॅक्सिओम स्पेस या अमेरिकन अंतराळ कंपनीच्या सहकार्याने आयोजित केले आहे. या मिशनमध्ये भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळ यानाचे पायलट म्हणून काम करतील, ते आयएसएसवर राहतील. त्यांच्यासोबत मिशन कमांडर पेगी व्हिटसन, तसेच पोलंड आणि हंगेरी येथील मिशन विशेषज्ञ असतील.हे मिशन भारतासाठी ऐतिहासिक आहे, कारण 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी अंतराळ प्रवास केल्यानंतर तब्बल चार दशकांनी भारतीय अंतरिक्ष यात्री आयएसएसवर पोहोचणार आहे.

या 14 दिवसांच्या मिशनमध्ये शुभांशु शुक्ला आणि त्यांची टीम सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (Microgravity) परिस्थितीत अनेक वैज्ञानिक प्रयोग करतील. यापैकी सात प्रयोग भारतातून आले आहेत, आणि त्यामध्ये वॉयेजर टार्डिग्रेड्स प्रयोग विशेष लक्षवेधी आहे. हा प्रयोग टार्डिग्रेड्स नावाच्या सूक्ष्म जीवांचा अभ्यास करेल, जे त्यांच्या टिकाऊपणामुळे ‘वॉटर बियर्स’ किंवा ‘मॉस पिगलेट्स’ म्हणून ओळखले जातात. टार्डिग्रेड्स हे आठ पायांचे, अत्यंत लहान (सुमारे 0.5 मिमी लांबीचे) सूक्ष्म जीव आहेत, जे 1773 मध्ये जर्मन प्राणीशास्त्रज्ञ जोहान ऑगस्ट एफ्राइम गोज यांनी प्रथम शोधले. त्यांचे मंद चालणे आणि पाण्यात राहण्याची सवय यामुळे त्यांना ‘वॉटर बियर्स’ असे नाव पडले. हे जीव त्यांच्या अविश्वसनीय टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहेत. ते अंतराळातील निर्वात (Vacuum), कॉस्मिक किरणोत्सर्ग, आणि -200 डिग्री सेल्सियस ते 150 डिग्री सेल्सियस पर्यंतच्या तापमानातही टिकून राहू शकतात.

टार्डिग्रेड्स अंतराळ संशोधनासाठी आदर्श आहेत, कारण त्यांची अत्यंत कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता मानवी अंतराळ प्रवासातील आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरणा देऊ शकते. या मिशनमध्ये सुप्त अवस्थेतील टार्डिग्रेड्स अंतराळात पुन्हा सक्रिय होऊ शकतात का, याचा अभ्यास केला जाईल. यासाठी टार्डिग्रेड्सला आयएसएसवर विशेष परिस्थितीत ठेवले जाईल. अंतराळात टार्डिग्रेड्स अंडी घालतात का, आणि ती अंडी उबवली जाऊ शकतात का, याचाही अभ्यास केला जाईल. याद्वारे अत्यंत कठीण वातावरणात जीवनाच्या मर्यादांचा शोध घेता येईल.