लोकसंख्या वाढल्याने जगाच्या विविध गरजाही वाढत आहेत. पाणी (Water) ही अशीच एक प्रमुख गरज आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी अनेक जलस्त्रोतांचा वापर केला जातो. यासोबतच पाण्याची गरज भागवण्यासाठी ‘बोअरिंग’ ही जमिनीतून पाणी काढण्याची एक सामान्य पद्धतही अवलंबली जाते. आता मानवाने जमिनीतून इतके पाणी बाहेर काढले आहे की, त्याचा पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणामकारक परिणाम झाला आहे.
एका नव्या अभ्यासात जमिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर काढल्याने 1993 ते 2010 दरम्यान पृथ्वीचा ध्रुव (Earth's Pole) आपल्या जागेपासून प्रत्येक वर्षी 4.36 सेंटीमीटरने हलला असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका गटाला असे आढळून आले आहे की, मानवाकडून भूजल मोठ्या प्रमाणावर बाहेर काढल्याने अवघ्या दोन दशकांहून कमी कालावधीत आपली पृथ्वी 4.36 सेमी/वर्ष या वेगाने सुमारे 80 सेमी पूर्वेकडे झुकली आहे.
हा अभ्यास जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात असेही समोर आले आहे की, भूजलाचा बहुतांश भाग अमेरिकेचा पश्चिम भाग आणि वायव्य भारत या दोन प्रदेशांमध्ये वापरला गेला आहे आणि त्याचे पुनर्वितरण केले गेले आहे. पंजाब आणि हरियाणाच्या भागात गेल्या काही वर्षांत भूजलाचा मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी वापर केला जात आहे.
याआधी, शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला होता की, 1993 ते 2010 दरम्यान, मानवाने केवळ 17 वर्षांत 2150 गिगाटन भूजल बाहेर काढले असावे. हे प्रमाण समुद्र पातळीमध्ये किमान 6 मिमीच्या वाढीइतके आहे. मात्र, या अनुमानाची पुष्टी करणे कठीण आहे. या संशोधनाने भविष्यासाठी नवीन दरवाजे उघडले आहेत. येत्या काही वर्षांत, भूजल शोषणावर पृथ्वी कशी प्रतिक्रिया देत आहे हे समजून घेणे शास्त्रज्ञांना सोपे होईल. (हेही वाचा: 'Space Flower': अंतराळात फूल फुलले, NASA ने फोटोही शेअर केले, तुम्ही पाहिले?)
महत्वाचे म्हणजे वाढत्या लोकसंख्येने आपल्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भूजलाचा झपाट्याने आणि तीव्रतेने वापर केला आहे. परंतु त्या तुलनेत तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात कोणाचेही स्वारस्य दिसून येत नाही. या अभ्यासात असे नमूद केले आहे की, सिंचनामुळे भूजलाचा ऱ्हास होणे आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होण्यात मानववंशीय योगदान आहे.