
मुंबईतील (Mumbai) मंत्रालयात (Mantralaya) येणाऱ्या पाहुण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक नियम जारी केले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारने मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या प्रवेशाचे नियमन करण्यासाठी आणि सचिवालयात होणाऱ्या निदर्शने आणि आत्महत्येच्या प्रयत्नांच्या घटनांना आळा घालण्यासाठी कलर-कोडेड आणि आरएफआयडी पास आणि अपॉइंटमेंटसाठी प्री-बुक टाइम स्लॉट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना त्यांच्या प्रवेश पासमध्ये निर्दिष्ट केलेल्या विभागांव्यतिरिक्त इतर विभाग किंवा मजल्यांना भेट देण्याची परवानगी दिली जाणार नाही. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना 1 एप्रिल पासून ‘डिजीप्रवेश’ (Digi Pravesh) या ऑनलाईन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याद्वारे नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारीत प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. तसेच टप्पा 2 अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात येणाऱ्यांची सरासरी संख्या 3,500 आहे आणि कॅबिनेट बैठकीच्या दिवशी ती 5,000 पर्यंत वाढते. गेल्या काही वर्षांत वरच्या मजल्यावरून उडी मारण्याच्या काही घटना घडल्यानंतर मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर व्यापक सुरक्षा जाळी बसवण्यात आली. पण तरीही हे प्रयत्न थांबले नाहीत. निषेधादरम्यान लोक जाळ्यावर चढू लागले.
काही आठवड्यांपूर्वी विदर्भातील शेतकऱ्यांचा एक गट सिंचन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याची मागणी करत मंत्रालयाच्या सुरक्षा जाळ्यात चढला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाच्या इमारतीत मोठ्या संख्येने लोक येत असल्याने प्रशासनाच्या कामावर परिणाम होत असल्याचे राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे. सुरक्षा विभागाच्या पोलीस उपायुक्तांना दररोज भेट देणाऱ्या परवानगी असलेल्या लोकांच्या संख्येचा डेटा देऊन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
मंत्रालयातील प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ वर नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालय बाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षा विषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करावे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करावे. (हेही वाचा: Maha Mumbai Metro WhatsApp Ticketing: महा मुंबई मेट्रोने सुरु केली व्हॉट्सॲप-आधारित तिकीट सेवा; रांगेत उभा न राहता केवळ 'Hi' मेसेजने होणार काम, जाणून घ्या नंबर व संपूर्ण प्रक्रिया)
ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.