Microscopic view of SARS-CoV-2 Virus | (Photo Credits: Twitter/ANI)

भारतामध्ये कोरोना विषाणूजन्य (Coronavirus) रोग पसरविणार्‍या सार्स-कोव्ह-2 (Sars-Cov-2) विषाणूचा देशातील पहिला फोटो समोर आला आहे. हे फोटो पुण्यातील शास्त्रज्ञांनी ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इमेजिंग वापरुन घेतले आहेत. या फोटोंना इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित केले आहेत. हे फोटो भारतातील कोरोना विषाणूच्या पहिल्या रूग्णाच्या नमुन्यातून घेण्यात आले आहेत. यामध्ये काटेरी मुकुटासारखा दिसणारा Sars-Cov-2 पाहायला मिळत आहे. दक्षिण चीनमधल्या शेनजेन इथल्या शास्त्रज्ञांच्या एका पथकाने कोरोनाच्या विषाणूचा फोटो प्रसिद्ध केला होता.

30 जानेवारीला केरळमधील एका विद्यार्थ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर, या व्यक्तीच्या घेतलेल्या गळ्यातील नमुन्याद्वारे शास्त्रज्ञांनी हे फोटो घेतले आहेत. ही व्यक्ती कोरोना व्हायरसचे केंद्र असलेल्या वूहान शहरातून केरळमध्ये परतली होती. या फोटोंद्वारे असे दिसून येत आहे की, की, Sars-Cov-2 हा विषाणू, 2002 मध्ये सार्स रोगास आणि 2012 मधील MERS रोगास कारणीभूत ठरलेल्या विषाणूसारखा आहे.

SARS-CoV-2 Virus फोटो -

 

या फोटोंविषयी बोलताना डॉ. गांगुली म्हणाले, ‘क्लिनिकल नमुन्यांमधील बदल समजून घेण्यासाठी आणि विषाणूची उत्क्रांती अनुवांशिक उत्पत्ती ओळखण्यासाठी हे फोटो महत्त्वपूर्ण आहेत. तसेच यामुळे हा विषाणू प्राण्यांमधून मनुष्यापर्यंत कसा आला हे आपल्याला समजण्यास मदत होईल. तसेच हा प्रसार एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे कसा झाला आणि तो अद्यायामध्ये काही बदल घडवून आणत आहे का, हे सुधा या फोटोद्वारे समजणार आहे. तसेच यामुळे या विषाणूवरील औषधे व लस तयार करण्यात मदत होईल’. (हेही वाचा: आता ‘कोरोना कवच’ App द्वारे समजणार आपल्या आजूबाजूच्या Coronavirus संक्रमित व्यक्तींची माहिती; जाणून घ्या सविस्तर)

फोटो घेणाऱ्या टीमचे नेतृत्व करणारे आणि पुणे येथील एनआयव्ही लॅबचे उपसंचालक, डॉ. अतनू बसू म्हणाले की, ‘नमुन्यामधील एक विषाणू चांगल्या प्रकारे संरक्षित केला होता, ज्याने कोरोना विषाणूसारखी वैशिष्ट्ये दर्शविली आहेत. त्यानंतर त्याला वेगळे करून त्याचे फोटो घेतले गेले. या केरळमधील व्यक्तीच्या नमुन्यात आढळलेला कोरोना विषाणू हा अनुवांशिकदृष्ट्या चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूशी 99.98 टक्के मिळताजुळता आहे.