Virat vs Rohit Captaincy Debate: विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापैकी कोण आहे चांगला टी-20 कर्णधार? गौतम गंभीरने केले स्पष्ट
विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

Virat vs Rohit Captaincy Debate: विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज, कर्णधार कोण याची चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले आणि पुन्हा एकदा रोहितकडे भारताच्या टी-20 चे नेतृत्व सोपवण्यात यावे याबाबत चर्चा सुरु झाली. याबाबत टीम इंडियाचा (Team India) माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, कर्णधार विराट कोहली आपली भूमिका चोख बजावत असला तरी उपकर्णधार रोहित शर्मा या कामात चांगला आहे. स्टार स्पोर्ट्सच्या Cricket Connected शो दरम्यान गंभीर म्हणाला, "विराट कोहली हा खराब कर्णधार नाही, मात्र रोहित शर्मा एक चांगला कर्णधार आहे. या दोघांच्या नेतृत्वात मोठा फरक आहे." कोहली आणि रोहितच्या आयपीएल विजेतेपदांचाही विचार केला पाहिजे, असे गंभीरने आवर्जून सांगितले. आयपीएलमध्ये 5 विजेतेपदांसह रोहित स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, तर दुसरीकडे, विराटला आजवर एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. विराटने 2013 मध्ये आरसीबी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती.

"जर आपण खेळाडू आयपीएलमधील खेळाच्या आधारे निवडतात तर मग कर्णधार आयपीएलमधील खेळाच्या आधारावर का नाही निवडत? जर आपण असे नाही करू शकत तर मग आयपीएलमध्ये केलेल्या गोलंदाजी आणि फलंदाजीला निवडण्याचा आधार नसला पाहिजे." दरम्यान, गंभीरच्या या विधानामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. आकाश चोपडा आणि पार्थिव पटेल हेही या चर्चेत सहभागी झाले होते. आपण कोणत्याही बदलाच्या बाजूने नसल्याच्या कल्पनेने चोपडा ठाम राहिले, तर पार्थिव पटेलने कबूल केले की रोहित हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे वाचू शकतो आणि दडपणाखाली उत्तम नेतृत्व करू शकतो.

दुसरीकडे, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आणि भारताला विजय मिळवून दिला होता. तर, 55 कसोटी सामन्यांमध्ये 33 विजयांसह कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात 89 वनडे सामन्यांमध्ये 62 आणि 37 टी -20 सामन्यांमध्ये टीम इंडियाने 22 जिंकले आहेत. रोहितने 10 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व करत अनुक्रमे 8 आणि 16 सामने जिंकले. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवलेल्या रोहितने त्यावर्षी जेतेपद जिंकले आणि त्यानंतर 2015, 2017. 2019 आणि 2020 मध्ये विजय मिळवला.