पाकिस्तानच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय (Photo Credit - X)

SA Beat PAK: रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाने एक असा पराक्रम करून दाखवला आहे, जो यापूर्वी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात इथे कोणत्याही संघाला करता आला नव्हता. पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५५ धावांनी शानदार विजय नोंदवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रावलपिंडीमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करून विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेची दमदार कामगिरी

२८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात, नाणेफेक हरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ गडी गमावून १९४ धावा केल्या. सलामी फलंदाज रीझा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) याने ४० चेंडूंमध्ये ५ चौकार आणि १ षटकारासह ६० धावांची दमदार खेळी केली. त्याचबरोबर, खालच्या फळीतील फलंदाज जॉर्ज लिंडे (George Linde) याने २२ चेंडूंमध्ये ३६ धावांची झटपट खेळी करत संघाला १९४ धावांपर्यंत पोहोचवले.

पाकिस्तानच्या फलंदाजांची निराशा

१९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ दबावाखाली विस्कटला आणि १८.१ षटकांतच केवळ १३६ धावा करून ऑल आऊट झाला. यजमान संघाकडून सैम अय्यूब (३७ धावा) आणि मोहम्मद नवाज (३६ धावा) यांनी थोडा संघर्ष केला, मात्र इतर फलंदाज मोठ्या भागीदारी करू शकले नाहीत. पाकिस्तानचे केवळ ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.

गोलंदाजांचे प्रभावी प्रदर्शन

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) याने भेदक गोलंदाजी करत ४ बळी घेतले. जॉर्ज लिंडे याने अष्टपैलू प्रदर्शन करत गोलंदाजीतही कमाल केली आणि ३ षटकांत ३१ धावा देऊन ३ बळी घेतले. लिजाद विलियम्सने २ तर लुंगी एंगिडीने १ विकेट घेतली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने रावळपिंडीच्या टी२० आंतरराष्ट्रीय इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना ३१ ऑक्टोबर रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळला जाईल.