भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवला जाईल. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे, मात्र तिसर्या कसोटीत टीम इंडियाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final) पोहोचण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला. आता डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी टीम इंडियाला (Team India) चौथी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो. खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या स्टार खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
ही असु शकते सलामीची जोडी
तिसऱ्या कसोटीत केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाली. फलंदाजीत तो अयशस्वी ठरला, पण चौथ्या कसोटीत त्याला संघातील स्थान पक्के करण्याची आणखी एक संधी मिळू शकते. तो कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला उतरू शकतो. चेतेश्वर पुजाराचे तिसऱ्या क्रमांकावर उतरणे निश्चित दिसते. पुजाराने इंदूर कसोटीत 59 धावांची इनिंग खेळली होती. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की त्याला बाद करणे कठीण होऊन बसते. (हे देखील वाचा: IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अनेकदा यशस्वी राहिले 'हे' कर्णधार, आकडे पाहून थक्क व्हाल)
अशी असू शकते मिडल ऑर्डर
भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहली अद्याप आपल्या लयीत दिसलेला नाही. त्याची सुरुवात चांगली होत असली तरी त्याला मोठ्या डावात रूपांतरित करता आलेले नाही. त्याचवेळी तिसऱ्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने श्रेयस अय्यरचे कौतुक केले. तो म्हणाला की, फिरकीच्या ट्रॅकवर तुम्हाला अय्यरसारखी फलंदाजी करण्याची गरज आहे. चौथ्या कसोटीतही तो खेळेल, असे वाटते. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 26 धावा केल्या. युवा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. अशा स्थितीत चौथ्या कसोटीत त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते.
या गोलंदाजांना मिळू शकते स्थान
भारतीय फिरकी त्रिकुटाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना खेळवणे निश्चित दिसते. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तिसऱ्या कसोटीत वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली होती, मात्र चौथ्या कसोटीत तो प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो आणि उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मोहम्मद सिराजला संघात साथ देण्याची संधी मिळू शकते.
चौथ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.