Kite, Death Image (Photo Credit - pixabay)

नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मकर संक्रांतीने (Makar Sankranti)  सणांची सुरूवात होते. मकर संक्रांत म्हटली की पतंगबाजीचा आनंद अनेकजण लुटतात. पण हा खेळ काहींच्या जीवावर उठवल्याचं पहायला मिळाले आहे. नायलॉन मांज्यामुळे (Nylon Kite String) दोघांचा गळा चिरला गेल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक जण अकोला (Akola) मध्ये दुसरा नाशिक (Nashik) मध्ये मृत्यूमुखी पडला आहे. मृतांची नावं सोनू धोत्रे आणि किरण सोनावणे आहे.

सोनू धोत्रे हा बाईक चालवत होता. नाशिक मध्ये पाथर्डी फाटा देवळाली कॅम्प भागात अचानक नायलॉन मांजा गळ्याभोवती आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तातडीने सोनू धोत्रेला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र अति प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. गुजरात मध्ये तो कॉन्ट्रॅक्ट वर्कर म्हणून कामाला होता. अपघाती मृत्यूचं प्रकरण नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नक्की वाचा: Nashik: नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात पोलिसांची कारवाई तीव्र; 24 गुन्हे दाखल, अल्पवयीन मुलांच्या वडिलांना अटक .

नाशिक प्रमाणेच अकोल्यामध्येही किरण सोनावणे नामक व्यक्तीने जीव गमावला आहे. किरण 40 वर्षांचा होता. बायपास फ्लायओव्हर वरून गाडी चालवताना त्याच्याही गळ्याला मांज्यामुळे जबर दुखापत झाली. हा नायलॉन मांजा चायनीज मांजा म्हणूनही ओळखला जातो.

सोनावणे यांच्या गळ्यातूनही अति प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यांना देखील हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. मुंबई पोलिसांनी मागील चार दिवसांमध्ये अनेक ठिकाणी विशेष मोहिमा राबवत, धाडी टाकून बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त केला आहे. 10 ते 13 जानेवारी दरम्यान भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांतर्गत एकूण 19 जणांना अटक करण्यात आली आहे किंवा त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत