देशभरात पतंग (Kite) उडवून मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण साजरा केला जातो. परंतु पतंग उडवताना वापरली जाणारी नायलॉनची दोरी म्हणजेच मांजा अनेकदा लोकांचा जीव घेते. प्राणी आणि पक्ष्यांसाठी देखील असा मांजा (Nylon Manja) खूप धोकादायक आहे. अशा परिस्थितीत नायलॉन मांजा विक्री व वापरावर कडक बंदी असतानाही त्याचा अवैध वापर सुरूच आहे. आता नाशिक (Nashik) पोलिसांनी विक्रेत्यांपेक्षा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांपर्यंत कारवाई वाढवली आहे, परिणामी रविवारी 10 पोलीस ठाण्यात 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे 33 आरोपींमध्ये नऊ अल्पवयीन आहेत.
याबाबत एकूण 21 जणांना अटक करण्यात आली असून, आठ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर 13 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे मुलांना नायलॉन मांजा पुरवल्याप्रकरणी त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांवर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 110 अंतर्गत निर्दोष हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सोमवारी सर्व नऊ मुलांच्या वडिलांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आणि त्यांच्या मुलांची सुटका करण्यात आली. डीसीपी प्रशांत बच्छाव म्हणाले, नायलॉन मांजावर बंदी आहे. आपली मुले पतंग उडवण्यासाठी कोणत्या प्रकारचा मांजा वापरतात हे पालकांनी जाणून घेतले पाहिजे. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात घडले असून, असून त्यात मांजामुळे लोक विशेषतः दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. (हेही वाचा: Nashik Nylon Manja: नायलॉन मांजाने चिरला गळा, नाशिक येथे तरुणाचा मृत्यू)
कारवाईत अंबडमध्ये नायलॉन मांजा वापरल्याप्रकरणी पोलिसांनी तीन बाप आणि त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल केला. भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यांतर्गत आणखी अटक करण्यात आली. मुंबई नाका पोलिसांनी एका अल्पवयीन आणि अन्य एका संशयितावर गुन्हे दाखल केले, तर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पवननगर येथे एका 22 वर्षीय तरुणाकडून 34,000 किमतीचे नायलॉन मांजाचे 34 बंडल जप्त केले. इंदिरानगर पोलिसांनी टेरेसवर नायलॉन मांजा वापरणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला अटक केली आणि त्याच्याकडून 2 हजार रुपये किमतीचे बंडल जप्त केले.