SRH vs KKR, IPL 2020: सनरायजर्सची शिस्तबद्ध गोलंदाजी, इयन मॉर्गन-दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीने नाईट रायडर्सची 163 धावांपर्यत मजल
सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: Twitter/IPL)

SRH vs KKR, IPL 2020: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात डेविड वॉर्नरच्या एसआरएचने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी केली आणि नाईट रायडर्सला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 163 धावांवर रोखले. अबू धाबी येथे सुरु असलेल्या सामन्यात केकेआरने पहिले फलंदाजी करून सनरायजर्ससमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले. केकेआरकडून मधल्या फळीने पुन्हा बॅटने निराश केले. सलामी फलंदाज शुभमन गिलने सर्वाधिक 36, नितीश राणाने 29 आणि राहुल त्रिपाठीने 23 धावांचे योगदान दिले. कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) 34 आणि माजी कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) नाबाद 29 धावा केल्या. दुसरीकडे, केकेआर गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत हैदराबादला आश्वासक धावसंख्येपर्यंत रोखले. नाईट रायडर्ससाठी टी नटराजनने 2 तर विजय शंकर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. (Sunil Narine Bowling Action Cleared: KKRसाठी खुशखबर, सुनील नारायणच्या गोलंदाजी शैलीला नियमन समितीने दाखवला हिरवा कंदील)

कोलकातासाठी शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी हैदराबादविरुद्ध सलामीला आले. टी नटराजनने त्रिपाठीला 16 चेंडूत 23 धावा करून क्लीन बोल्ड करून केकेआरला पहिला धक्का दिला. राशिद खानने शुभमनला 36 धावांवर प्रियम गर्गकडे झेलबाद करून नाईट रायडर्सला दुसरा धक्का दिला. यानंतर, विजय शंकरने नितीश राणाला यंदाही गर्गकडे कॅच आऊट करून टीमला तिसरा धक्का दिला. यानंतर, माजी कर्णधार दिनेश कार्तिकच्या पुढे आलेला आंद्रे रसेल यंदाही अपयशी ठरला. रसेल 9 धावा करून नटराजनच्या चेंडूवर विजयकडे झेलबाद झाला. अखेर कर्णधार मॉर्गनने 23 चेंडूत 34 धावा केल्या आणि माजी कर्णधार कार्तिकने 14 चेंडूत 29 धावांची द्रुत खेळी खेळली. दोघांनी 58 धावांची भागीदारी करत संघाला सन्माननीय धावसंख्या गाठून दिली.

यापूर्वी, आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी दोन बदल केले. कोलकाताने प्रसिद्ध कृष्णाच्या जागी कुलदीप यादव, तर क्रिस ग्रीनच्या जागी लोकी फर्ग्युसनला संधी दिली आहे. दुसरीकडे, खलील अहमदच्या जागी हैदराबादने बासिल थंपी आणि अब्दुल समदचा शाहबाज नदीमच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.