PAK Team (Photo Credit - Twitter)

आशिया कपच्या (Asia Cup 2023) इतिहासात पाकिस्तानने एक मोठा विक्रम केला आहे. शनिवारी श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय फलंदाजांना 48.5 षटकात 266 धावांवर रोखले. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्याने शानदार फलंदाजी केली. मात्र, यानंतर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत सर्व 10 बळी घेतले. शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 35 धावा देऊन 4 बळी घेतले, तर नसीम शाहने 8.5 षटकात 36 धावा देत 3 बळी घेतले. यासह हरिस रौफने 9 षटकात 58 धावा देत 3 बळी घेतले. यासह पाकिस्तानने आशिया कपच्या इतिहासात मोठा विक्रम केला.

आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे

सर्व वेगवान गोलंदाजांच्या मदतीने आशिया कपमध्ये सर्व 10 विकेट घेणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे. एखाद्या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट घेतल्याचे हे प्रथमच घडले आहे. या सामन्यात पाकिस्तानने तीन फिरकी अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली असली तरी शादाब खान, मोहम्मद नवाज आणि सलमान अली यांना एकही बळी घेता आला नाही. (हे देखील वाचा: IND vs PAK: शाहीद आफ्रिदीने 'जावई' Shaheen Afridi चे अनोख्या पद्धतीने केले कौतुक, ईशान-पांड्याची केली स्तुती)

पावसामुळे सामना झाला रद्द 

सामन्यावर पावसाचे सावट होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात 266 धावा केल्या. पावसामुळे पाकिस्तान संघाला फलंदाजी करता आली नाही आणि सामना रद्द झाला. अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. या सामन्यानंतर पाकिस्तान सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. तर भारताचा पुढचा सामना 4 सप्टेंबरला नेपाळशी होणार आहे.