सचिन तेंडुलकरचे पहिले कसोटी शतक (Photo Credit: Twitter/ICC)

क्रिकेटचा देव मानल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरसाठी (Sachin Tendulkar) आज, 14 ऑगस्ट हा दिवस खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी सचिनने शतकांच्या शंभरीचा (Sachin 100 Centuries) प्रवास सुरु केला होता. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी अवघ्या 30 वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिनने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते ज्याने सचिनच्या उत्तम कारकीर्दीचा पाया रचला होता. 15 ऑगस्टच्या (स्वतंत्र दिवस) आदल्या दिवशी त्याने आपल्या ऐतिहासिक खेळीसह संघाला कठीण स्थितीतून बाहेर काढले होते. 14 ऑगस्ट 1990 रोजी सचिनने वयाच्या 17 व्या वर्षी 112 दिवस कसोटी शतक झळकावले होते. त्याने मॅनचेस्टर (Manchester) येथे इंग्लंडविरुद्ध 189 चेंडूत 119 धावा केल्या. त्या खेळीत त्याने 17 चौकार ठोकले. सचिनच्या 100 शतकाची ही सुरुवात होती. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके आणि वनडे सामन्यात 49 शतके ठोकली आहेत. कसोटीत सचिनची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 248 आहे जी त्याने 2004 मध्ये ढाका येथे बांग्लादेशविरुद्ध केल्या होत्या. ('राहुल द्रविडच्या खेळाने अनेकदा सचिनला तेंडुलकरलाही झाकून टाकलं,' पाकिस्तानी क्रिकेटपटूने सचिन-द्रविडची तुलना करत केले महत्वाचे विधान)

सचिनचे शतक अशा वेळी आले जेव्हा टीमला त्याची सर्वाधिक गरज होती. इंग्लंडविरुद्ध या सामन्यात भारत अत्यंत कठीण स्थितीत होता. दुसऱ्या डावात 408 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याचे 6 फलंदाज 183 च्या स्कोअरवर पॅवेलियनमध्ये परतले होते. पण सचिनने मनोज प्रभाकर यांच्यासह सामना बरोबरीत रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सचिनने 119 तर प्रभाकर यांनी 67 धावा केल्या. सचिनने पहिल्या डावात 68 धावा केल्या होत्या आणि भारताने 432 धावा केल्या. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ग्रॅहम गूच, माइकल आर्थर्टन आणि रॉबिन स्मिथच्या शतकाच्या जोरावर 519 धावांची विशाल धावसंख्या उभारली होती. भारताची सुरुवात चांगली नव्हती, रवि शास्त्री आणि नवजोत सिंह सिद्धूची सलामीची जोडी स्वस्त बाद झाली. यानंतर मोहम्मद अझरुद्दीनच्या 179 आणि संजय मांजरेकर यांच्या 93 जणांनी भारताला बळ दिले. इंग्लंडने आपला दुसरा डाव 320/4 वर घोषित केला. एलन लैंबने 109 धावा केल्या.

दुसर्‍या डावात भारताला 408 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण नियमित अंतरावर भारतीय संघ विकेट गमावत राहिला. पण सचिन आणि प्रभाकर यांच्या भागीदारी भारताला पराभवातून बाहेर काढले. 7 वर्षांपूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिनच्या नावावर अजूनही क्रिकेटविश्वातील अनेक विक्रमांची नोंद आहे. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम, सचिन अजूनही सर्वांपेक्षा पुढे आहे आणि पुढील काही वर्षे त्याचे रेकॉर्ड अबाधित राहणार असे दिसत आहेत.