क्रिकेटच्या मैदानातून टीम इंडियाच्या ‘या’ 5 खेळाडूंनी राजकीय खेळपट्टीवर केली जोरदार बॅटिंग, वाचा सविस्तर
गौतम गंभीर (Photo Credit: Getty Images)

Cricketers Who Became Politicians: एखादा क्रिकेटपटूने राजकारणाच्या आखाड्यात उतरणे ही काही भारतात (India) नवीन नाही आणि परदेशात तर अजिबात नाही. क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या आजवर आपण अनेक खेळाडूंना राजकीय खेळपट्टीवर सक्रिय असताना पाहिलं आहे. यापैकी काही फ्लॉप झाले तर काही यशस्वी ठरले आणि क्रिकेटच्या खेळाप्रमाणेचराजकीय क्षेत्रात देखील आपली प्रभावी ओळख निर्माण केली आहे. भारतात देखील आजवर अनेक खेळाडू राजकीय आखाड्यात उतरले आहेत ज्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. यापैकी काही आमदार तर जोरदार बॅटिंग करत खासदार झाले आहेत. (टीम इंडियातील ‘हे’ 5 स्टार क्रिकेटपटू आहेत ‘या’ पाच श्रीमंत कुटुंबांचे जावई)

कीर्ती आझाद (Kirti Azad)

भारताच्या 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य माजी अष्टपैलू कीर्ती आझाद यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले आणि बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून तीनदा विजय मिळवला. फेब्रुवारी 2019 मध्ये ते कॉंग्रेस पक्षात सामील झाले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आझाद यांनी 7 कसोटी सामने (1981-83) आणि 25 वनडे आंतरराष्ट्रीय (1980-86) खेळले.

नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu)

सध्याच्या पंजाब सरकारमधील मंत्री नवजोत सिंह सिद्धू यांनी 2004 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली होती. भारतासाठी 51 कसोटी आणि 136 एकदिवसीय सामने खेळणारे सिद्धू यांनी राजकीय कारकीर्दीत अनेक भूमिका बजावल्या आहेत. 2014 मध्ये भाजपाने त्यांना तिकीट नाकारले आणि ही जागा पक्षाचे प्रमुख रणनीतिकार अरुण जेटली यांना दिली. 2016 मध्ये त्यांना राज्यसभेचे तिकीट देण्यात आले पण त्यांनी राजीनामा दिला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आणि आता सध्या ते पंजाब राज्याचे पर्यटन, सांस्कृतिक कार्य व संग्रहालये मंत्री आहेत.

गौतम गंभीर (Gautam Gambhir)

2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गंभीरने 2018 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. 2019 मध्ये त्यांनी पूर्वी दिल्ली मतदारसंघातून उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षात विजयी प्रवेश केला. गंभीर कोरोना व्हायरसच्या या काळात सोशल मीडियावर अधिक सक्रिय असून जनतेच्या मदतकार्यात हातभार लावत आहे.

मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin)

स्टायलिस्ट हैदराबादी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनने 2009 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय खेळी सुरू केली होती. 2009 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून अझर यांनी सार्वत्रिक निवडणुक जिंकली व खासदार बनले. तथापि 2014 लोकसभा निवडणुकीत मुरादाबाद मतदार संघातून माजी भारतीय कर्णधारपदाला पराभवाचा सामना करावा लागला. ते सध्या तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. 1990 च्या दशकात 47 कसोटी सामन्यांमध्ये अझरुद्दीनने भारतीय संघाचे नेतृत्व केले.

चेतन चौहान (Chetan Chauhan)

टेस्टमध्ये सुनील गावस्करचे सलामी साथीदार राहिलेले चेतन चौहान उत्तर प्रदेशमधील अमरोहा मतदारसंघातून दोनदा खासदार राहिले आहेत. 1981 मध्ये क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षात दाखल झाले. 2017 मध्ये ते उत्तर प्रदेश विधानसभेवर नौगवान सदात (विधानसभा मतदारसंघ) मधून निवडून आले आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये युवा आणि क्रीडा मंत्री म्हणून काम करत आहेत.