IPL 2021: आयपीएलमधून भारताचे 3 तडाखेबाज फलंदाज झाले मालामाल, पार केला 100 कोटींच्या कमाईचा टप्पा
विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी (Photo Credit: PTI)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात लिलाव आयोजित केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. पुढील वर्षी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये (IPL) सामील होणार असल्याने यंदा मिनी-लिलाव आयोजित करणार असून पुन्हा एकदा बड्या-बड्या खेळाडूंवर बोली लगावली जाईल. स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, केदार जाधव अशा टी-20 क्रिकेटमधील काही दमदार खेळाडूंसाठी यंदा बोली लगावली जाईल. आयपीएल क्रिकेट विश्वातील सर्वात प्रसिद्ध आणि रोख समृद्ध लीग आहे. दरवर्षी नवनवीन खेळाडूंवर मोठ्यात मोठी बोली लगावली जाते. आयपीएलयामध्ये आजवर 5 खेळाडूंनी 100 कोटी कमाईचा टप्पा गाठला आहे, पण स्पर्धेतून सर्वात मालामाल होण्याचा मान तर टीम इंडियाच्या त्रिमूर्तीलाच मिळाला आहे आणि ती म्हणजे माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), आयपीएलचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि भारताची रनमशीन विराट कोहली (Virat Kohli) आहेत. स्पर्धेतील या तीनही खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या कमाईचा 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. (IPL 2021: RCB ने रिटेन करत AB de Villiers 100 कोटी क्लबमध्ये एंट्री करणारा बनला पहिला विदेशी क्रिकेटर, टॉप-3 मध्ये भारतीयांचे अधिराज्य)

आयपीएलची सुरुवात 2008 पासून झाली आणि हे तीनही खेळाडू सुरुवातीपासून स्पर्धेचा भाग राहिले आहेत व निःसंशयपणे हे तीन स्पर्धंतून सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत आघाडीवर असतील. यानंतर नुकताच या यादीत सामील झाला आणि तो म्हणजे एमएस धोनीचा सीएसके साथीदार सुरेश रैना. रैना देखील आता आयपीएलमध्ये 100 कोटींची कमाई करणारा खेळाडू बनला आहे. रैनाला सीएसकेने 11 कोटी रुपयात संघात रिटेन केले आणि यासह आयपीएलमध्ये कमाईच्या बाबतीत शंभरी गाठली. भारताच्या रोख-समृद्ध लीगमध्ये धोनीने ऐतिहासिक 150 कोटींच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. 2020 पर्यंत धोनीने आयपीएलमधून 137 कोटींची कमाई केली होती, मात्र 2021 साठी देखील चेन्नई फ्रँचायझीने पुन्हा एकदा 15 कोटी रूपांतत्याच्याशी करार केला असल्याने त्याने कमाईचा विक्रमी टप्पा गाठला. धोनीनंतर आयपीएलमधून कमाई करण्याच्या बाबतीत रोहित दुसऱ्या स्थानावर येतो. रोहित आणि विराटने 13 वर्षाच्या आयपीएल कालावधीत अनुक्रमे 131.6 कोटी आणि 126.2 कोटी रुपये कमावले आहेत.

याशिवाय, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सला रिटेन केलं ज्यामुळे स्पर्धेत रेकॉर्ड-ब्रेक कामगिरी करणाऱ्या फलंदाजाने देखील रैनासह 100 कोटी कमाईचा टप्पा गाठला आहे.