IND vs SA 2nd ODI: भारताची ‘आर या पार’ची लढाई, KL Rahul अँड ब्रिगेडने ‘या’ 3 समस्यांचा तोडगा नाही काढला तर दक्षिण आफ्रिका संघ घेणार फायदा
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI 2022: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पराभव टाळण्यासाठी कर्णधार केएल राहुल (L Rahul) आणि संघ व्यवस्थापनाला मोठे परिश्रम करायला लागणार आहे. पार्लच्या बोलंड पार्क (Boland Park) येथे झालेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिले बॅट आणि नंतर बॉलने टीम इंडियावर (Team India) वर्चस्व गाजवले व पाहुण्या संघावर सुरुवातीपासून दडपण आणले. भारतीय संघातील (Indian Team) ज्येष्ठ खेळाडूंना वगळता अन्य खेळाडूंची कमजोरी सामन्यातून स्पष्टपणे समोर आली ज्याचा फायदा यजमान संघाला झाला. टेंबा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन मास्टरक्लास खेळीनंतर Proteas संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वातील संघाकडे गोष्टी योग्य दिशेने परत येण्यासाठी एक दिवस आहे. त्यामुळे जर भारताला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करून शुक्रवारी मालिका 1-1 अशी बरोबरीत आणायची असेल तर तीन गोष्टीत सुधार करणे आवश्यक आहे. (नवोदित अष्टपैलू Venkatesh Iyer ने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत गोलंदाजी न करण्यामागचे ‘हे’ कारण आले समोर, शिखर धवनने केला खुलासा)

मधली फळी

एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा महिन्यांहून अधिक कालावधीनंतर पुनरागमन केल्यामुळे भारतासाठी मधली फळी ही प्रमुख चिंतेची बाब ठरली. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कामगिरी करू शकला नाही तर रिषभ पंत सातत्य राखण्यात अपयशी ठरला. तसेच पदार्पणात फिनिशर फलंदाज म्हणून व्यंकटेश अय्यरचा प्रयोग पूर्णपणे चुकीचा ठरला. व्यंकटेशचा गोलंदाजी विभागात वापरला गेला नाही.

फिरकी गोलंदाजी

रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) फिरकी जोडी प्रभाव पाडण्यात अपयशी ठरली. दोघांनी 20 षटकात एकूण 106 धावा लुटल्या. विकेट्स घेण्याच्या अक्षमतेमुळे बावुमा आणि डुसेन यांना भागीदारीचा विक्रम नोंदवण्यात आली व दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर पकड घट्ट केली. भारताच्या 2018 Proteas दौऱ्यावर चहल आणि कुलदीप यादव यांनी 33 विकेट घेत भारताने 5-1 असा विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने फिरकीपटूंवर प्रतिआक्रमण कसे केले हे डुसेनने व्यक्त केले. “मी मैदानात गेलो आणि मला माहित होते की मला माझ्या स्वीप व रिव्हर्स-स्वीपमध्ये जावे लागेल आणि त्यांच्या फिरकीपटूंवर दबाव आणावा लागेल. सुरुवातीपासूनच इरादा दर्शविणे महत्त्वाचे होते,” सामन्यानंतर वॅन डर डुसेन म्हणाला.

भुवनेश्वर कुमार-शार्दूल ठाकूर

मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आल्याने भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) जसप्रीत बुमराहला मदत करण्यात अपयशी ठरले. भुवनेश्वरने 64 धावा दिल्या, तर शार्दुलने 72 धावा लुटल्या. याशिवाय दोघे विकेटही घेऊ शकले नाही. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या या दोघांना आपली सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे जे पहिल्या एकदिवसीय सामन्यात दिसले नाही.