India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs NZ 2nd Test 2024) 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात (Pune) होणार आहे. बंगळुरूमध्ये पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, तर भारताचे लक्ष मजबूत पुनरागमनाकडे आहे. पुण्यात भारताचा हा तिसरा कसोटी सामना आहे. याआधी टीम इंडियाने 2 सामने खेळले होते, त्यापैकी एका सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळाला होता. 2017 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 333 धावांनी पराभव झाला होता, तर 2019 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला होता.
पुण्याच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत?
पुण्याच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहणार आहे. ही काळ्या मातीची खेळपट्टी आहे. खेळपट्टीवर हलके गवत कापण्यात आले असून ते संथ गतीने अपेक्षित आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्राउंड स्टाफने खेळपट्टी उन्हात उघडी ठेवली आहे आणि फिरकीसाठी पूर्णपणे तयार आहे. पहिल्या दिवसापासूनच खेळपट्टीवर वळण येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फिरकी गोलंदाजांना मोठी मदत होईल.
फिरकीपटू असतील सामन्याचे हिरो
पुण्याच्या खेळपट्टीवर नेहमीच फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत फिरकीपटूंची मोठी भूमिका असेल. भारताकडे रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे त्रिकूट आहे, तर वॉशिंग्टन सुंदरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. गरज भासल्यास भारतीय संघ चार फिरकीपटूंसोबत जाऊ शकतो. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024 Probable Playing XI: दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल? पहिल्या सामन्यात 150 धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणार सुटी!)
न्यूझीलंडकडेचे फिरकी गोलंदाज
न्यूझीलंडकडे एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनरसारखे फिरकी गोलंदाज आहेत, जे भारतीय फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. आता टीम इंडिया किती फिरकीपटूंसोबत मैदानात उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नाणेफेक जिंकून संघाला फलंदाजी करायला आवडेल
असे सांगितले जात आहे की खेळपट्टी हळूहळू फिरकीपटूंना मदत करेल, अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे ठरेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची उत्तम संधी असेल, कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणे कठीण होऊ शकते.