IND vs ENG 3rd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची तिसरी कसोटी 25 ऑगस्टपासून लीड्स येथे खेळली जाणार आहे. भारतीय संघ (Indian Team) सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जेव्हा तिसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरतील, तेव्हा त्यांच्या रडारवर कपिल देव (Kapil Dev) यांचा रेकॉर्ड असेल. यापैकी एक रेकॉर्ड कपिल देवच्या कसोटी षटकारांचा असेल. कपिल देवने 131 कसोटीच्या 184 डावांमध्ये 2831 धावा केल्या आहेत, ज्यात 61 षटकारांचा समावेश आहे. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीयांमध्ये ते सेहवाग, धोनी आणि सचिननंतर चौथ्या क्रमांकावर आहेत. 41 कसोटीच्या 70 डावांमध्ये 61 षटकार मारून रोहित देखील कपिल देवच्या बरोबरीत आहे. आता अशा परिस्थितीत जर त्याने लीड्स कसोटीत आणखी एक षटकार ठोकला तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीयांमध्ये कपिल यांना मागे टाकेल. (IND vs ENG: लीड्स कसोटीसाठी कर्णधार Virat Kohli याची कसरत, पाहा कशाप्रकारे करतोय विजयाची तयारी)
दुसरीकडे, कपिल देव कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारे सर्वात वेगवान भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनी 25 कसोटींमध्ये हे आश्चर्यकारक कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराहकडे आता कपिल देव यांचा हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे, ज्यापासून तो फक्त 5 विकेट दूर आहे. बुमराहने आतापर्यंत 22 कसोटीत 95 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत जर त्याने लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या तर हरियाणा हरिकेनचा विक्रम मोडला जाईल. तसेच, जर बुमराह लीड्समध्ये हा पराक्रम करू शकला नाही, तर त्याला ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीतही ही संधी मिळेल. भारताकडून सर्वात वेगवान 100 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा मान फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला मिळाला आहे. अश्विनने केवळ 18 कसोटींमध्ये हा आकडा गाठला होता. बुमराहने आतापर्यंत या मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने नॉटिंगहॅम येथे पहिल्या कसोटीत 9 विकेट आणि लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत तीन विकेट्स घेतल्या.
दुसरीकडे, यापूर्वी लॉर्ड्स कसोटीत युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कपिल देवचा विक्रम मोडला होता. सिराजने लॉर्ड्सवर एकूण 8 विकेट्स घेतल्या आणि त्याने माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांचा 39 वर्ष जुना विक्रमही मोडला. सिराजने दोन्ही डावात 126 धावा देऊन 8 विकेट्स घेतल्या, तर 1982 मध्ये कपिल देवने त्याच मैदानावर 168 धावा देऊन 8 विकेट्स घेतल्या होत्या.