IND vs ENG 2nd Test Day 3: अश्विन-विराटचा इंग्लंडला धोबीपछाड! चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बनले हे प्रमुख रेकॉर्ड
विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 2nd Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या चेन्नई टेस्टच्या (Chennai Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. यजमान संघाने चेपॉक (Chepauk) सामन्यावर आपली पकड मजबूत केली आणि पाहुण्या इंग्लंड संघाला बॅकफूटवर ढकललं आहे. दुसऱ्या डावात अश्विनच्या शतकी धमक्याच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) जो रूटच्या इंग्लिश टीमला 482 धावांच मोठं लक्ष्य दिले आहे. अश्विनने 134 चेंडूत 106 धावांचा शानदार डाव खेळला. प्रत्युत्तरात, चेन्नईच्या कठीण खेळपट्टीवर इंग्लंड फलंदाज दुसऱ्या डावतीही अपयशी ठरताना दिसत आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अवघ्या 53 धावांवर 3 विकेट गमावल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 429 धावांची गरज आहे. दरम्यान, संपूर्ण दिवसावर यजमान भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं. सामन्यादरम्यान काही महत्वपूर्ण रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहे. (IND vs ENG 2nd Test Day 3: टीम इंडियाची दुसऱ्या Chepauk टेस्टवर मजबूत पकड; दिवसाखेर इंग्लंड 3 बाद 53 धावा, विजयासाठी आणखी 429 धावांची गरज)

1. चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अश्विनने 8व्या क्रमांकावर येत शंभरी पार केली आणि भारताकडून आठव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर येत खेळाडूंनी केलेल्या सर्वाधिक शतकांमध्ये या तीन शतकांसह अश्विन अव्वल क्रमांकावर पोहोचला. हरभजन सिंह, एमएस धोनी आणि कपिल देव यांनी या क्रमांवर येत प्रत्येकी 2 शतक झळकावले आहे.

2. दुसऱ्या डावात अष्टपैलू आर अश्विनने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावले. एकाच सामन्यात शतक आणि पाच विकेट घेण्याचा खास विक्रम अश्विनने केला. यासह सर्वाधिक वेळा एका कसोटी सामन्यात शतकासह 5 विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अश्विनने दुसरे स्थान पटकावले आहे.

3. कर्णधार विराट कोहलीने 7 चौकारांच्या मदतीने 149 चेंडूत 62 धावा केल्या. विराटचे कसोटी करिअरमधील हे 25वे अर्धशतक होते, तर 50 किंवा अधिक धावा करण्याचीही त्याची 52 वी वेळ होती. अशाप्रकारे तब्बल 52 वेळा धावांची पन्नाशी पार करत विराटने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. त्याने कसोटी कारकिर्दीत 51 वेळा हा पराक्रम केला आहे.

4. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शतकी खेळी करणारा अश्विन के श्रीकांत यांच्यानंतर तामिळनाडूचा दुसरा फलंदाज ठरला.

5. इंग्लंडविरुद्ध रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शंभरी पार केली आहे. अश्विनचे हे पाचवे कसोटी शतक आहे, तर त्याने मागील 4 शतके एकट्या वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले आहेत.

6. भारतीय कर्णधार विराट कोहलीला सर्वाधिक वेळा नाडणाऱ्या गोलंदाजांमध्ये आता मोईन अलीचा देखील समावेश झाला आहे. मोईनने कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये  पाच वेळा बाद केले आहे.

7. 2010 मध्ये पदार्पणानंतर चेतेश्वर पुजारा कसोटीत सर्वाधिक नवव्या वेळी धावबाद झाला.

दरम्यान, चेन्नईच्या खेळपट्टीवर उर्वरित सात विकेट घेण्यासाठी यजमान टीम इंडियाकडे दोन दिवसांचा कालावधी आहे तर इंग्लंडला आणखी 429 धावांची आवश्यकता आहे. पाहुण्या इंग्लंडसाठी पहिल्या कसोटीत द्विशतक करणाऱ्या कर्णधार जो रूटवर मदार असेल. तथापि, या वेळी आव्हान बरेचच कठीण आहे.