टीम इंडिया (Photo Credit; Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 3: चेपॉकवर भारत आणि इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. अश्विनने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 134 चेंडूत धमाकेदार शतक पूर्ण केलं. अश्विनच्या शतकी खेळीमुळे भारताला दुसऱ्या डावात 286 धावा करता आल्या आणि यजमान टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचं आव्हन दिलं. अशाप्रकारे दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या इंग्लंडने 3 विकेट गमावून 53 धावा केल्या, तर त्यांना विजयासाठी आणखी 429 धावांची गरज आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार जो रूट 2 धावा आणि डॅन लॉरेन्स 19 धावा करून खेळत होते. दिवसाखेर अक्षर पटेलने डोम सिब्ली व जॅक लीच आणि अश्विनने रोरी बर्न्सला बाद करत दोन सलामी फलंदाजांना माघारी धाडलं. यापूर्वी, गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या मिळणाऱ्या खेळपट्टीवर आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले पण, कर्णधार विराट कोहली आणि अश्विनने इंग्लंड फिरकीपटूंचा धैर्याने सामना करत 96 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. (IND vs ENG 2nd Test Day 3: Chepauk वर Ashwin वादळ, चौकारासह पूर्ण केले शानदार 5वे कसोटी शतकासह केले अनेक कीर्तिमान)

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवत इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली, मात्र विराट-अश्विनच्या भागीदारीने त्यांना बॅकफूटवर ढककले. यादरम्यान, विराटने अर्धशतकी धावसंख्या गाठली आणि अश्विनने कसोटी क्रिकेटमधील पाचवे तर इंग्लंडविरुद्ध पहिले शतक झळकावले. अश्विन आणि मोहम्मद सिराजच्या जोडीने दहाव्या विकेटसाठी 49 भागीदारी रचली ज्यामुळे यजमान संघाने दुसऱ्या डावात 286 धावा केल्या व पाहुण्या संघाला 482 धावांच तगडं आव्हान दिलं. ओली स्टोनने शतकवीर अश्विनला जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही आणि शंभरी पार करताच 106 धावांवर माघारी पाठवलं. अश्विनने आपल्या खेळीत 148 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 1 षटकार लगावले. अश्विनशिवाय दुसऱ्या डावात विराटने 62 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीच आणि मोईन अलीेने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या तर, स्टोला 1 विकेट मिळाली.

यापूर्वी, टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत टीम इंडियासाठी सलामी फलंदाज रोहित शर्माने शानदार दीडशतकी खेळी केली. रोहितने 161 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने त्याला चांगली साथ दिली आणि वैयक्तिक 67 धावा केल्या. त्यानंतर, रिषभ पंत 58 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, इंग्लंडकडून पहिल्या डावात एकही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. बेन फोक्स सर्वाधिक 42 धावा करून नाबाद परतला. इंग्लंडचा अर्धा संघ पहिल्या डावात अश्विनच्या फिरकीत अडकला. अश्विनने 5 फलंदाजांना बाद केलं. इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेत अश्विनला चांगली साथ दिली.