Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी होणार आहे. चेन्नईतील प्रतिष्ठित एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) हा सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना या स्टेडियमवर 1987 मध्ये खेळला गेला होता. एमए चिदंबरम स्टेडियम चेपॉक स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते. या स्टेडियमची 38 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. यामध्ये आशिया कप, वर्ल्डकपसह अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेडियमचा इतिहास मोठा आहे आणि अनेक खेळाडूंनी त्यात आपली नावे जोडली आहेत. यावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड काय आहे ते जाणून घेऊया. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd ODI Pitch Report: चेन्नईत वेगवान गोलंदाजांची दिसणार दहशत की फिरकीपटूंना होणार मदत? इथे पहा खेळपट्टीचा अहवाल)

चेन्नईत भारताचा विक्रम

भारताने एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण 14 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 7 वेळा विजय मिळवला आहे तर 5 वेळा या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2-2 वेळा वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान तर 1 वेळा ऑस्ट्रेलियाने भारताला येथे पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर तो एमए चिदंबरम स्टेडियमवर 5 वनडे खेळला आहे. यामध्ये भारताविरुद्ध एकदा विजय तर एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. म्हणजेच 5 पैकी फक्त एकदाच ऑस्ट्रेलिया येथे पराभूत झाला आहे.

नाणेफेकीवर सामना किती अवलंबून आहे?

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर येथे प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. येथे खेळल्या गेलेल्या 31 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने 15 जिंकले आहेत, तर द्वितीय फलंदाजी करणार्‍या संघाने 16 जिंकले आहेत. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 230 धावांची आहे, तर भारतीय संघाने 2007 मध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली होती जेव्हा एमएस धोनी आणि सेहवाग यांनी संघासाठी धडाकेबाज खेळी खेळली आणि 337 धावा केल्या.